सिन्नर तालुका वार्तापत्र: ....आता तरी धडा घ्या

सिन्नर तालुका वार्तापत्र: ....आता तरी धडा घ्या

सिन्नर | विलास पाटील | Sinnar

शहरात सिन्नरकरांची जीवनवाहिनी सरस्वती नदीला (Saraswati River) आलेल्या पुराने सिन्नरकरांसह प्रशासनाच्या हलगर्जीपणाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. ‘तुम्ही माझ्याशी खेळाल, तर तुमचा खेळ करायला मला फार वेळ लागणार नाही’, असा संदेश सरस्वती नदीच्या पुराने सिन्नरकरांना दिला आहे.

सिन्नर शहरासह तालुक्याच्या काही भागात त्या दिवशी विक्रमी पाऊस (Record rainfall) पडला असे म्हणणे निसर्गाशी प्रतारणा करण्यासारखेच आहे. निसर्ग (Nature) आपल्या पद्धतीने नेहमीच देत आला आहे. मात्र, निसर्गाकडून घेताना ओरबाडण्याची जी प्रवृत्ती माणसांमध्ये वाढली आहे त्या प्रवृत्तीलाच चपराक देण्याचे काम या पुराने केले आहे. सरस्वतीचा उगम जवळच्या ढग्या डोंगरावर झाला असून शहरापर्यंत येणार्‍या नदीच्या प्रवाहाला तीन-चार बंधारे ओलांडत यावे लागते. त्याप्रमाणे पूरपाणी आले.

मात्र, या पाण्याच्या प्रवाहात आपणच एवढे अडथळे उभे करून ठेवले आहेत की गरज पडताच नदीने सर्व अडथळे बाजूला सारत रौद्ररूप धारण केले आणि तिच्या जिवावर उठलेल्या सिन्नरकरांना धडा शिकवला आहे. खरे तर सरस्वती ही कधीकाळी सिन्नरकरांची जीवनवाहिनी होती. तिच्याच अंगा-खांद्यावर सिन्नरकरांचे दैनंदिन जीवन अवलंबून होते. पिण्यासह वापराचे पाणी, भाजीबाजार, सण- सोहळे, कीर्तन, ग्रामदैवताची यात्रा सरस्वतीच्या साक्षीनेच होत होती. मात्र, आधुनिकतेच्या मागे लागल्यानंतर मूळ स्रोत आपण दुर्लक्षित केले. सन 1998 नंतर फारसे पूर (flood) नदीला बघायलाच मिळाले नाहीत आणि त्याचाच गैरफायदा काही सिन्नरकरांनी घेतला.

हळूहळू नदीच्या पात्रात अतिक्रमण (Encroachment) सुरू झाले आणि नदीला नाल्याचे रूप आले. ऐश्वर्य मंदिराजवळ नदीचे विस्तीर्ण पात्र आता कुठे शिल्लक राहिले आहे? या नदीच्या पत्रात दोन्ही बाजूंनी बांधकामे झाली आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी सिमेंटची पक्की बांधकामे (Cement concrete structures) केली तर कोणी ऐपतीप्रमाणे मातीचे घर बांधले. देवी मंदिराजवळ पूल ओलांडला तर नदीचे पात्र दहा फुटाचेही राहिलेले नाही एवढी लांबलचक घरे त्या नदीतच बांधण्यात आली आहेत. त्यानंतर प्रत्येकाने नदीचे पात्र बुजवत आपले क्षेत्र वाढवण्याचे धोरण अवलंबल्याने नदीचा जीव गुदमरणारच ना! बाराद्वारी जवळच्या घरांसह नर्सरीमध्ये यापूर्वीही अनेकदा पुराचे पाणी शिरले आहे.

तरीही त्यातून आपण धडा घेणार नसू तर नदी निर्दयीपणे वागली असे तरी आपण कसं म्हणणार? नदीच्या पात्रातली अतिक्रमण (Encroachment) काढू नये म्हणून दबाव आणणारेही तेवढेच या संकटाला जबाबदार आहेत. खासदार पुलाजवळील टपर्‍या अचानक कशा वाढल्या? नव्या पुलावरील संरक्षक पाईप गायब होऊन टपर्‍या कशा आल्या? नगर परिषदेने (nagar parishad) कुठलाही सारासार विचार न करता नदीपात्रात अधिकृतपणे गाळे वाढवले. त्यामुळे ज्यांचे हितसंबंध नगरसेवकापासून वरपर्यंत आहेत, ते स्वतःच्या टपर्‍या त्या रिकाम्या वाटणार्‍या जागेत टाकून मोकळे झाले.

नवा पुलापासून पडकी वेस ते जुन्या संगमनेर नाक्यापर्यंत दोन्ही बाजूने अतिक्रमणे करण्यात कुणीच कसर ठेवलेली नाही. कुणी स्वतःच्या प्लॉटची संरक्षक भिंत थेट नदीपत्रात बांधली. तर कुणी बाथरुम, ओटे बांधून ठेवले. अपना झोपडपट्टीतील घरांचं तर बोलायलाच नको. सापडेल त्या जागेवर आडवी तिडवी घरे बांधून ठेवली. त्यातील अनेकांची शहरात स्वतःची घरे आहेत. हे संकट पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर नदी अतिक्रमण (River encroachment ) मुक्त करायला हवी.

नदीवरील खासदार पूल व पडक्या वेशीवरील पुलाची उंची 5-10 फुटापर्यंत वाढवायला हवी. मात्र, त्याचवेळी खासदार पुलावरील ब्रिटिशकालीन बंधार्‍याला हात न लावता या बंधार्‍यातलं पाणी सुरळीतपणे गाव पाटाच्या माध्यमातून परिसरातील शेतीला सुजलाम सुफलाम करत राहील याकडेही लक्ष द्यावे लागेल. बारागाव पिंप्री रस्त्यावरील कोठुरकर मळ्यातील बंधार्‍यासह नगरपरिषद हद्दीतील सर्व बंधार्‍यांची गळती थांबवावी लागेल व त्याची दुरुस्तीही करावी लागेल.

एवढी हिंमत कशी होते?

घोटी-डुबेरे रस्त्याच्या कोपर्‍यावर नाशिकच्या बिल्डरने शिवनदीचे पात्र बुजवून त्यावर पार्किंग आणि गार्डन उभारले आहे. एवढी हिंमत एखादा बिल्डर कशी करू शकतो? पाटबंधारे विभागाच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी नदीवरील अतिक्रमणाकडे का दुर्लक्ष केले? त्यांनी त्यावेळी आपले कर्तव्य इमानदारीने पार पाडले असते तर आता पार्किंग खचण्याची वेळ आली नसती. या नदीचे पात्र मोजून नदीला मोकळा श्वास घेऊ द्यावा व नदीपात्रात अतिक्रमण होत असताना डोळेझाक करणार्‍या तत्कालीन अधिकार्‍यांसह बिल्डरवर गुन्हे दाखल करावेत. त्याशिवाय अशा प्रकारांना आळा बसणार नाही.

दोन-तीन मजली संकुल हा पर्याय

अपना गॅरेज झोपडपट्टीच्या जागेवर पूर्ण रस्त्याला समांतर संकुल बांधले तर खाली गाळे व वरच्या दोन-तीन मजल्यांवर अतिक्रमणधारकांना फ्लॅटस् सहज उपलब्ध होऊ शकतात. गावाबाहेरील देवी मंदिरापासून जुन्या संगमनेर नाक्यापर्यंतच्या अगदी भंडारवाडीतील अतिक्रमण धारकालाही तेथे फ्लॅट उपलब्ध होऊ शकतो. एसटी महामंडळाच्या धर्तीवर थेट तीस-पस्तीस वर्षांसाठी गाळ्यांचा लिलावाने भाडेपट्टा ठरवला गेला तर त्यातून इमारतीच्या बांधकामाच्या खर्चाचा फार बोजाही नगरपरिषदेवर पडणार नाही आणि बकाल होऊ पाहणार्‍या शहराचा चेहरामोहराही बदललेला दिसू शकेल.

जुन्या संगमनेर नाक्यापासून वावी वेस व तेथून थेट तहसीलपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने गाळे बांधून त्यावरही फ्लॅटस् काढले गेले तर संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त व्हायला वेळ लागणार नाही. अपना गॅरेजसमोरील जुन्या जनता शाळेच्या खेळाच्या मैदानाला अतिक्रमणाचा वेढा पडू लागला असून त्या जागेवरही चांगले संकुल उभे राहू शकते.

‘सरस्वती’चे सौंदर्यीकरण का रोखले?

माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली सरस्वती नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. गुणवत्तापूर्ण असलेल्या या कामाचे कौतुक तेव्हाच्या जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर केले होते. मात्र, त्यानंतर अचानक हे काम बंद करण्यात आले. खरे तर निधीची अडचणही नव्हती. ज्यांच्या तक्रारीमुळे काम बंद करण्यात आले तेच आता त्याचा हिशेब विचारू लागले आहेत. राजकारण नक्की करावे. मात्र, गावाचे हित जोपासणार्‍या चांगल्या कामात राजकारण आले तर काय होते हे आता दिसून आले आहे.

त्यावेळी सरस्वतीचे पात्र स्वच्छ व प्रशस्त झाले असते तर आजचे संकट उभे राहिले नसते. आता तरी प्रशासक व मुख्याधिकार्‍यांनी कोणाच्याही तक्रारीकडे लक्ष न देता नदीचे पात्र स्वच्छ करावे. तिच्या काठावरील गावाबाहेरील देवी मंदिरापासून जुन्या संगमनेर नाक्यापर्यंतचे, दोन्ही तीरावरचे प्रत्येक अतिक्रमण काढावे आणि नदीचे पात्र प्रशस्त करावे. त्यासाठी गरज भासल्यास पाटबंधारे विभागाचे जुने नकाशे मिळवून नदीची हद्द निश्चित करावी.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com