सिन्नर तालुका वार्तापत्र: शहर स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सिन्नर तालुका वार्तापत्र: शहर स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सिन्नर | विलास पाटील | Sinnar

सिन्नर शहर (sinnar city) व परिसरात म्हणावा असा पाऊस (rain) झालेला नसतानाही शहरातील वाढता कचरा (garbage), घाण सिन्नरकरांचे आरोग्य (health) धोक्यात आणणारे ठरत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात (monsoon), त्यापूर्वी औषध फवारणीसह स्वच्छता मोहिमा (Cleanliness campaign) राबवल्या जायच्या. मात्र, यंदा नगरपरिषद प्रशासनाला (Municipal Council Administration) अशा मोहिमा राबवण्याचा विसर पडला आहे. सिन्नरकरांच्या आरोग्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही असाच भाव त्यातून प्रकट होत आहे.

दरवर्षी धो-धो पाऊस (heavy rain) आला की गटारींबरोबरच साचलेली घाणही वाहून जाते आणि नगर परिषदेचे (nagar parishad) काम सोपे होते. मात्र, यंदा अर्धा पावसाळा (monsoon) संपत आला तरी असा जोरदार पाऊस अजून झालेला नाही. त्यामुळे गटारीतली (Sewerage) घाण तशीच आहे. शहराच्या मध्यमातून जाणार्‍या सरस्वती नदीतील (Saraswati River) घाण तर इतकी वाढली आहे की नदी जवळून जाणार्‍यांना नाक दाबूनच पुढे जावे लागते. नदीच्या दुतर्फा एवढी दुर्गंधी पसरली असतानाही एखादी स्वच्छता मोहीम राबवावी असे नगरपरिषद प्रशासनाला वाटू नये हे सिन्नरकरांचे दुर्भाग्य म्हणायला हवे.

या नदीच्या एका बाजूला दैनंदिन भाजी बाजार भरतो तर दुसर्‍या बाजूला ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे मंदिर आहे. या मंदिरासह महागणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून (maharashtra) दररोज शेकडो भाविक येत असतात. त्यांनाही देवाच्या दर्शनाला नाक दाबून जावे लागणार असेल तर ती शोकांतिकाच म्हणावी लागेल. भाजी बाजारातला कचरा हाही असाच कळीचा मुद्दा असून हा कचरा पावसाने (rain) सडल्यामुळे बाजारात फिरताना नाक दाबावे लागत आहे. शहराच्या जवळपास सर्वच भागात अशीच परिस्थिती आहे. चार-पाच वर्षांपूर्वी शहरासह उपनगरांमध्ये विविध औषधांची फवारणी केली जात होती.

दर दोन-चार महिन्यांनी ट्रॅक्टर (tractor) अथवा धुराळा मशीन घेऊन नगर परिषदेचे सेवक फिरत होते. नगरसेवकांमध्ये जणू फवारणीसाठी स्पर्धा लागायची. यंदा नगरसेवक (Corporator) नसल्याने सेवकांची ही गरज संपल्याचे दिसत आहे. यंदा अजून तरी नगरपरिषदेचे कोणीही अशी फवारणी करत फिरताना दिसलेले नाही. रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत रस्त्याने फिरणार्‍यांसाठी धोकेदायक बनले आहे. दरवर्षी या वाढलेल्या गवतावरही फवारणी होत होती. यंदा फक्त रस्त्याच्या दुभाजकांमधील गवत काढण्याच्या कामालाच प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. नगरपरिषदेत नगरसेवक नाहीत. प्रशासक राज आहे म्हणून यंत्रणा सुस्तावल्या आहेत असा अर्थ यातून काढावा का?

दैनिक भाजी बाजाराबरोबरच आठवडे बाजारालाही कुठे शिस्त दिसत नाही. खासदार पुलापासून बाजार वेस ते गंगावेस, सरदवाडी रस्ता, उपजिल्हा रुग्णालयापासून बारागाव पिंप्री (Baragaon Pimpri) रस्त्यापर्यंत भाजी विक्रेते, फळ विक्रेते कुठेही बसतात. खरे तर रस्ता सोडून मागे जागा असतानाही भर रस्त्यात बसण्याचे प्रमाण वाढले आहे. गंगावेशीला तर अर्धा रस्ताच भाजी बाजारामुळे बंद होतो. रविवारच्या आठवडे बाजारासाठी कुंदे मेडिकलपासून मुबलक जागा असतानाही भाजीविक्रेते बारागाव पिंप्री रस्त्याकडेच अधिक गर्दी करतात.

अर्धा पिंप्री रस्ता या विक्रेत्यांमुळे बंद होऊन जातो तरी कुणालाही त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. गावभर पसरलेल्या भाजी बाजारातील कचरा सिन्नरकरांचे आरोग्य (health) बिघडवण्यास कारणीभूत ठरतोय. शहरातील चिकन विक्रेते त्यांच्याकडील मांसल घाण बारागाव पिंप्री रस्त्यासह कुठल्याही निर्जन स्थळी फेकून निघून जातात. त्यांना रोखण्याची जबाबदारी कोण घेणार? एखाद्या आजाराचे रुग्ण वाढायला लागल्यानंतरच धावपळ करायची का? पुरेसे सेवक, अगदी कंत्राटी कामगार हव्या त्या संख्येने उपलब्ध असताना सिन्नरकरांच्या आरोग्याशी खेळ का? मध्यंतरी शहरासह उपनगरातील कचरा उचलणार्‍या घंटागाडीवरील सेवकांनी चार दिवस काम बंद केले. त्यांना चार-चार महिने पगार मिळत नाही. कंत्राटी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी वेळेत न भरणे हा गुन्हा आहे.

असे असताना संबंधित ठेकेदार (Contractor) सहा-सहा महिने भविष्य निर्वाह निधीचे पैसे कापून घेतल्यानंतरही भरत नाही. या सेवकांना हंँड ग्लोज, बुटापासून अन्य सुविधा पुरवल्या जात नसतानाही नगरपरिषद प्रशासन संबंधित ठेकेदारावर एवढे मेहरबान का आहे असे अनेक प्रश्न सिन्नरकरांना पडत आहेत. असाच कारभार असेल तर सिन्नरकरांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार? स्वच्छ भारत अभियानात देशाच्या पश्चिम विभागात दुसरा क्रमांक पटकावल्यानंतर याच स्वच्छता सेवकांचा सत्कार नगर परिषदेने केला होता.

आता त्यांना आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात काम बंद आंदोलन करावे लागत असेल तर स्वच्छ भारत अभियानाचे पूढचे टप्पे शहरात यशस्वी कसे होतील? हगणदारी मुक्त शहराचा दर्जा आपण प्राप्त केल्यानंतर नगर परिषदेला अडीच कोटींचे बक्षीस मिळाले होते. याच बक्षिसाच्या काही रकमेतून सरस्वती नदीच्या स्वच्छतेसह सुशोभीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली होती. मग अचानक ही मोहीम अर्धवट का सोडण्यात आली हे सर्व सिन्नरकरांच्या समोर आले पाहिजे. सिन्नरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही. अगदी नगरपरिषदेलाही नाही याचे भान संबंधितांनी ठेवायला हवे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com