सिन्नर तालुका वार्तापत्र: निवडणूका जाहीर होऊनही सारेच ‘वेट अँड वॉच’ मोडवर

सिन्नर तालुका वार्तापत्र: निवडणूका जाहीर होऊनही सारेच ‘वेट अँड वॉच’ मोडवर

सिन्नर | विलास पाटील | Sinnar

नगरपरिषदेच्या (nagar parishad) निवडणुका (election) जाहीर झाल्या असून उद्या (दि.13) जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समितीचे (panchayat samiti) आरक्षण (Reservations) जाहीर होणार आहे.

तरीही तालुक्याच्या राजकीय आघाडीवर शांतता दिसत आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) निर्णय येत नसल्याने सर्वच ‘वेट अँड वॉच’ मोडवर असल्याचे बघायला मिळत आहे. नगर परिषदेत शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांची सत्ता होती. निवडणूक (election) लागण्यापूर्वी प्रभागांची पुनर्रचना होते.

शक्यतो सत्ताधारी गट प्रभाग रचना आपल्याला सोयीची ठरेल असा प्रयत्न जाता जाता करत असतो. मात्र, मधल्या राजकीय घडामोडीत नगरसेवक बाळासाहेब उगले यांच्यासह काही नगरसेवक आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) गटाला जाऊन मिळाल्याने कोकाटे गट नगरपरिषदेत बहुमतात आल्याचा दावा केला गेला. मात्र, त्यानंतर दोन-तीन फुटीर नगरसेवक पुन्हा स्व:गृही परतल्याने पुन्हा वाजे गटाचे अर्थात शिवसेनेचे पारडे जड झाले. या फुटीर नगरसेवकांना परत यायचेच होते तर ते गेलेच कशाला होते असा प्रश्न कोणालाही पडेल.

आमदार फुटतात तेव्हा खोक्याची भाषा सर्वत्र ऐकायला मिळते. इथे तर सिन्नरसारख्या ‘ब’ वर्ग नगर परिषदेत कुठून खोके येणार? झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात ते काही खोटे नाही. शहरातील एका मोक्याच्या जागेवरील आरक्षण उठवण्यासाठी नगरसेवकांची जमवा-जमव आवश्यक बनल्याने हे दोन-तीन नगरसेवक (Corporator) परत आणले गेल्याचे बोलले जात आहे. परत आलेले पुन्हा शिवसेनेच्या गोटात रमल्याची चर्चा असली तरी ते आधीच रमले असते तर उपनगराध्यक्ष निवडीत पक्षाची आणि राजाभाऊंची झाली ती शोभा झाली नसती.

त्यामुळे जाणार्‍या फुटीरांना सेनेच्या गोटातूनच कुणाची तरी फूस होती ही त्यावेळी झालेली चर्चा निरर्थक म्हणता येणार नाही. अर्थात सेना बहुमतात असल्याने प्रभाग रचनेत त्यांचा वरचष्मा असेल असे अनेक जाणकारांना वाटत होते. मात्र, राज्यातल्या तेव्हाच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार माणिकराव कोकाटे यांच्या काही चेल्यांनी प्रभाग रचनेत स्वतःच्या मर्जीप्रमाणे बरेच फेरफार केल्याची चर्चा त्यांच्या गोटातून ऐकायला मिळत होती. प्रशासनाने स्वतःच्या केबिनला बाहेरून कितीही कुलपे ठोकली तरी या बंद दाराआड काय चालले तेही या निमित्ताने बघायला मिळाले.

प्रभाग रचनेत आपल्या सोयीचे सर्व झाले असल्याचा निरोप देणार्‍याने स्वतःच्या प्रभागाची सोय पाहण्याच्या नादात आपल्याच इतर सहकार्‍यांची गैरसोय केली असल्याची चर्चा प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सुरु झाली आहे. आता ही नवी प्रभाग रचना त्यांना डोकेदुखी ठरत असल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या गटांच्या पुनर्रचनेत दुरुन दुरुन काहीही संबंध नसलेल्या गावांना राजकीय वजन वापरुन जिल्हा परिषद गटासाठी घरोबा करण्यास भाग पाडण्यात आले.

अगदी तसाच प्रकार नगर परिषदेतही झाला असून कोकाटे गटातील इच्छुकांना त्यातून घाम फुटला असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने राज्य सरकारकडून पाहिजे तेवढा निधी आणण्यावर आता मर्यादा येणार आहेत. त्यातच निवडणूक राष्ट्रवादी म्हणून लढाईची तर भुजबळ समर्थकांनाही सामावून घ्यावे लागेल. तालुका काँग्रेसला सोबत घेणार की नाही याबाबत त्यांच्याच पदाधिकार्‍यांनाही काही स्पष्ट झालेले नाही. शिवसेनेतही सारे काही आलबेल नाही.

शिवसेनेच्या फुटीचा परिणाम तालुक्यातही होणार असल्याची चर्चा आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बोलावलेल्या माजी आमदारांच्या बैठकीला राजाभाऊ वाजे उपस्थित राहण्यासाठी आज सकाळीच मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर तालुक्यातील काही सो-कॉल्ड नेते सेनेतील बंडखोरांबरोबर पंढरपूरपर्यंत गेल्याची चर्चा आहे. सुरतेच्या फुटीचेही ते साक्षीदार असल्याची चर्चा होत आहे. शिवसेनेतील फुटीर गटाला तालुक्यात वारसदार मिळाले तर ते भाजपाबरोबर जाऊ शकतात. भाजपा बर्‍याच महिन्यांपासून दुरुनच सर्व घडामोडी पहात असली तरी योग्य संधीच्याही शोधात आहे.

संघटनात्मक पातळीवर त्यांची तयारीही सुरु आहे. मनसेने तर भोंगे वाजवून यापूर्वीच आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा इशारा दिला आहे. बच्चू कडूंची प्रहार तालुक्यात दोन गटात विभागलेली असतानाही, गुडघ्याला बाशिंग बांधून कधीची बिगुल वाजण्याची प्रतीक्षा करत आहे. निवडणुकीचा फड गाजवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष अर्थात पैलवान सज्ज आहेत. मात्र, सर्वांनाच ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचीही आस आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्याच लागतील असा आदेश दिलाच तर निवडणुकीचा फड गाजायला फार वेळही लागणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com