सिन्नर : शिवाजीनगरमध्ये धाडसी घरफोडी
नाशिक

सिन्नर : शिवाजीनगरमध्ये धाडसी घरफोडी

रोख ८० हजारांसह ५ तोळे सोन्याचे दागिने लांबविले

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर । प्रतिनिधी

शिवाजीनगर भागातील जून्या पवार शाळेजवळ बंद बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख 80 हजार व 5 तोळे सोन्याचे दागिने असा 2 लाख 80 हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना आज (दि.5) सकाळी 5 वाजता उघडकीस आली.

घोटेवाडी येथील श्रीधर सबाजी सरोदे (50) हे येथे बंगला बांधून कुटूंबियांसह राहतात. मंगळवारी (दि.4) सकाळी 8 वाजता बंगल्याच्या दरवाज्याला कुलूप लावून ते कुटूंबियांसह घोटेवाडी येथील शेतात गेले होते. रात्री ते तेथेच मुक्कामी थांबले. अज्ञात चोरट्यांनी रात्री त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

कपाटाचे कुलूप तोडून त्यातील एका डब्यातील रोख 80 हजार रुपये चोरट्याने काढून घेतले. शेतीतील सोयाबीन व भाजीपाला विकून मिळालेले हे पैसे सरोदे यांनी डब्यात ठेवलेले होते. कपाटातील छोट्या डब्यांमध्ये दिड तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, दोन तोळ्याची सोन्याची पोत, अर्धा तोळ्याचे डोरले, दोन ओम पान असा 2 लाखांचा ऐवजही चोरटे घेऊन गेले. कपाटातील सर्व सामान त्यांनी खोलीत अस्ताव्यस्त फेकले होते. किचनमधील अनेक डब्यांचीही त्यांनी उचकापाचक केली होती.

चोरट्यांनी कुलूप तोडण्यापूर्वी सरोदे यांच्या शेजारच्याच खोलीत भाड्याने राहणाऱ्या दिलीप साबळे यांच्या घराला बाहेरुन कडी लावली होती. पहाटे 5 वाजता साबळे यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाहेरुन कडी लावल्याचे त्यांच्या लक्षात आले. माडीवर राहणाऱ्या वामन कातोरे यांना फोन केल्यानंतर त्यांनी येवून दरवाजा उघडला. त्यानंतर सरोदे यांच्याकडील चोरीचा खूलासा झाला. कातोरे यांनी सरोदे यांना फोन करुन चोरीची माहिती दिली. त्यानंतर ते कुटूंबियांसह तातडीने घराकडे परतले.

पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वानाने पुढच्या आडव्या रस्त्यापर्यंत माग दाखवला. तेथून एखाद्या वाहनाने चोरटा पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांनी ठसे तज्ञांनाही पाचारण केले. त्यांनी काही संशयास्पद ठसे मिळवल्याचे समजते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com