सिन्नर : नियम न पाळल्याने पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

सिन्नर : नियम न पाळल्याने पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

सिन्नर । वार्ताहर

करोनाच्या दुसर्‍या लाटेची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घालत संचारबंदीची घोषणा केली आहे. सरकारच्या निर्बंधाकडे कानाडोळा करत काही जण विनाकारण, विनामास्क बाहेर फिरतात. त्यामूळे मुसळगाव एमआयडीसी पोलिसांनी जिंदाल फाट्यावर नाकाबंदी करत बेशिस्त नागरीकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी राबविलेल्या मोहिमेचे कौतूक होत आहे.

राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. करोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने 15 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. असे असतांना संचारबंदीच्या आदेशाला पायदळी तुडवत काही जण विनाकारण व विनामास्क प्रवास करतात, फिरत असतात. खरं तर नियम मोडणार्‍यांवर कडक कारवाई करा असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. तरी देखील काही नागरीक अत्यावश्यक सेवेचे कारण पूढे करत बिनदिक्कत फिरुन शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत आहे.

संचारबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी माळेगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन मुसळगाव एमआयडीसीजवळील जिंदाल फाट्यावर आज (दि.17) नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान नागरीक व कामगारांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. विनाकारण, विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईही पोलिसांनी केली. पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोविंद खुळे, नितीन सांगळे यांनी ही मोहिम यशस्वीपणे राबविली.

18 जणांवर दंडात्मक कारवाई

संचारबंदीच्या काळात विनाकारण, विना मास्क कुणीही घराबाहेर पडू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहे. असे असतांनाही काही जण विनाकारण अत्यावश्यक कारण सांगून बाहेर पडत आहे. त्यामूळे आज जिंदाल फाट्यावर नाकाबंदी करुन विनाकारण फिरणार्‍या व विनामास्क आढळणार्‍या 18 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापूढील काळातही नाकाबंदी सुरुच राहिल. त्यामुळे कुणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.

दशरथ चौधरी, पोलीस निरीक्षक, माळेगाव एमआयडीसी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com