
पंचाळे | प्रतिनिधी Panchale
सिन्नर (Sinnar) तालुक्यातील पंचाळे (Panchale) येथील पूजाने आपल्या पहिल्या पगारातून आई वडील ,सासू सासरे यांना विमानाची सफर घडवून देवदर्शनाला नेले. पंचाळे येथे माहेर असलेल्या पूजाच्या निर्णयाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या निर्णयाचे सर्वांकडूनच कौतुक होत आहे....
येथील माजी सरपंच कैलास गंगाधर थोरात (Ex sarpanch kailas thorat) व संगीता थोरात (Sangeeta thorat) यांची मुलगी पूजा हिचा विवाह कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील रवंदे (Ravande) येथील कदम परिवारात झालेला आहे. पूजा ही प्राथमिक शाळेपासून अत्यंत हुशार होती. दहावीत ती प्रथम क्रमांकाने पंचाळे विद्यालयात उत्तीर्ण झाली होती.
वडील कैलास थोरात हे रयत शिक्षण संस्थेच्या चासनळी (Chasnali) येथील विद्यालयात लिपिक म्हणून नोकरीस आहे. त्यांनी पूजाच्या उच्च शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्ल्या. परंतु मुलगा आणि मुलगी असा भेद न करता त्यांनी मुलाप्रमाणेच मुलीसही उच्च शिक्षण दिले.
उच्च शिक्षण घेताना पूजास अनेक वेळा अपयश आले. विवाहानंतरही सासरच्या कुटुंबीयांनी पूजाच्या उच्चशिक्षणाची काळजी घेतली व पाठिंबा दिला. अनेक वेळा अपयश पदरी येऊनही सासु सासरे व आई-वडिलांच्या प्रेरणेने पूजाने स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले.
त्यामुळे या उच्च शिक्षणाच्या जोरावर पूजाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये (Maharashtra Rural Bank) नोकरी मिळाली. त्यामुळे दोन्ही परिवारामध्ये आनंदाला उधान आले. परंतु आपल्या नोकरीच्या पहिल्या पगार सार्थकी लागावा व पहिला पगार चिरंतर स्मरणात राहावा म्हणून पूजानेही पहिल्या पगाराच्या रकमेतून तिचे वडील कैलास थोरात व आई संगीता थोरात, सासरे ज्ञानदेव सूर्यभान कदम व सासू अलका ज्ञानदेव कदम यांचा विमानाचा खर्च करून तिरुपती बालाजीचे दर्शन घडविले.
त्यांना एक आगळी वेगळी दिवाळी भेट दिली. पूजाच्या या निर्णयाने तिच्या माहेरी व सासरी दोन्ही कुटुंबामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण केले आहे. आजच्या काळामध्ये सासू-सासर्यांची सेवा न करता त्यांना सतत त्रास देणे त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून हिरावून घेणे व आई बापाच्या जमीन, पैसा यामध्ये स्वार्थी हेतूने हक्क दाखवणाऱ्या महिलांना पूजा ने हा निर्णय घेऊनमोठी चपराक दिली आहे.
त्यामुळे इतर महिलांनीही पूजाच्या उपक्रमाचे नुसते शाब्दिक स्वागत न करता त्याचे आचरण स्वतःच्या माहेरी व सासरी केले पाहिजे. व पूजा चा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तरच दोन्ही कुटुंबामध्ये नवचैतन्याची भावना सतत राहील.
आजमितीस केवळ मुलगाच आईबापांचा सर्वेसर्वा असल्याचा भास निर्माण झाला आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये आधार आश्रमामध्ये वृद्ध मातापित्यांची होणारी गर्दी लक्षात घेता मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.
याचे खरे आचरण पूजा च्या माध्यमातून समाजाला घडले आहे. दोन्ही कुटुंबाला एका माळेमध्ये गुंफून ठेवून आई-वडिल सासू सासरे व सर्वांच्या मनामध्ये सदैव आपुलकीची भावना ठेवून पूजाने आगळावेगळा आदर्श समाजापुढे उभा केला आहे.