सिन्नर : साठवून ठेवलेला मका भिजतोय पावसात

शासनाने खरेदी थांबविल्याने शेतकरी हवालदिल
सिन्नर : साठवून ठेवलेला मका भिजतोय पावसात
Maize Store in MarketSinnar

पंचाळे । वार्ताहर

सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाने हमीभावाने नोंदणीकृत 485 शेतकऱ्याकडून 11 हजार 576 क्विंटल मक्याची खरेदी केली आहे. खरेदी बंद झाल्याने अद्यापही 1000 शेतकऱ्यांच्या मक्याची खरेदी बाकी आहे.

शासनाच्या भरवशावर साठवून ठेवलेला मका पावसामूळे ओला होऊन खराब होत असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

शासनाने 1760 रुपये हमीभावाने मका खरेदी करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकरी खूष झाला होता. मात्र, त्याची ही खूषी फार दिवस टिकली नाही. शासनाने प्रत्येक शेतकऱ्याची 35 क्विटल मका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करुन खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते.

त्याप्रमाणे 1502 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात उद्दीष्टपूर्ती झाल्याचे कारण दाखवत सर्व शेतकऱ्यांचा मका खरेदी केला गेला नाही. तालुक्यातील केवळ 485 शेतकऱ्यांचा मका खरेदी झाला असून अजूनही तालुक्यातील 1 हजार शेतकरी शासनाच्या या योजनेपासून वंचीत राहीले आहेत.

तालुक्यातून संघाच्या माध्यमातून 50 हजार क्विंटल मका खरेदी होईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, त्यातील केवळ 11 हजार 576 क्विंटल मका खरेदी झाला. खरेदीच्या चक्रव्यूहात अडकल्याने 31 जुलैनंतर मका खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.

दुसऱ्या हंगामातील मका काढणीला आला असताना मागच्या वर्षाचा मका अद्यापही विक्री अभावी शेतातच पडून आहे. उंदीर, घूस यांच्या पाठोपाठ पावसानेही या मक्याचे नुकसान केले आहे. त्यामूळे शासनाच्या या योजनेनंतर फायद्यापेक्षा तोटाच जादा झाल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

शासकीय पातळीवर शेतकऱ्यांना कोणीही वाली नाही. लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत. त्यामूळे शासनाच्या योजना येवूनही प्रत्यक्षात फायदा पोहचत नाही अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे.

शासन खरेदी करणार आहे या आशेने मका खुल्या बाजारातही विकला नाही आणि आता पावसामूळे त्याचे होणारे नुकसान उघड्या डोळ्याने बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com