सिन्नर : मेडीकल दुकाने फक्त सहा तास राहणार सुरु
medicine

सिन्नर : मेडीकल दुकाने फक्त सहा तास राहणार सुरु

मेडीकल असोसिएशनचा निर्णय

सिन्नर । विलास पाटील Sinnar

लॉकडाऊनच्या काळात हॉस्पिटलमधील वगळता सिन्नर शहरातील सर्व मेडीकल दुकाने सकाळी १० ते दुपारी ४ याच वेळेत उघडे ठेवण्याचा निर्णय मेडीकल असोसिएशनने घेतला आहे.

लॉकडाऊनच्या काळात देशभरातील हॉस्पिटल व मेडीकल दुकानांना अत्यावश्यक सेवा म्हणून २४ तास उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शहरात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मेडीकलही दिवसभरात केवळ सहा तासच सुरु ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेऊन तहसिलदारांना तशी माहिती दिली.

औषधे घेण्याच्या नावाखाली मेडीकलमध्ये अनावश्यक गर्दी वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी शहरातील सर्व मोठ्या हॉस्पिटलमधील मेडीकल दुकाने २४ तास सुरु राहणार असल्याचेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

अनेक मेडीकल दुकानांमध्ये औषधांबरोबरच बिस्किट, साबण, तेलासह अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळू लागल्या आहेत. तर काही आयुर्वेदिक औषधे विकणाऱ्यांकडे सर्व किराणा मिळत असल्याने औषधांच्य नावाखाली पळवाटा शोधल्या जात असल्याचा तक्रारीही सुरु झाल्या होत्या. औषध विक्रेत्यांच्या संघटनेने घेतलेल्या निर्णयाचे त्यामूळे शहरात कौतूक होत आहे.

एकाच दिवसात १२५०० चा दंड वसूल

लॉकडाऊनच्या काळात अनावश्यक घराबाहेर पडू नका असे प्रशासनाने बजावल्यानंतरही रस्त्यावर येणाऱ्यांच्या विरोधात आज (दि.२२) दंडात्मक कारवाई करण्यात आली. सध्या देशभर अनलॉक सुरु असला तरी मोटार सायकलवर एकालाच फिरण्यास परवानगी आहे. तर कारमध्ये चालकासह तिघांनाच प्रवास करता येतो. असे असतांना मोटार सायकलवर डबल सीट फिरणाऱ्यांना पोलीस व नगर पालिकेने आज झटका दिला.

डबल सीट फिरणाऱ्यांकडून प्रत्येकी २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारमध्ये तीनपेक्षा जादा प्रवासी असणाऱ्यांनाही प्रत्येकी २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. मास्क न बांधता फिरणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसभरात जवळपास ६० व्यक्तींकडून १२५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर व पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांनी दिली.

मिळणार वाढीव पोलीस..

अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक शमिष्ठा घारगे-वालावलकर, उपअधिक्षक माधव रेड्डी यांनी आज (दि.२२) सिन्नरला भेट देऊन लॉकडाऊनच्या काळातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. लॉकडाऊन तोडणाऱ्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सिन्नर शहरातील पोलीस ठाण्यात पोलीसांची संख्या कमी असून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांबरोबरच शहरात बंदोबस्त लावण्यासाठी ही संख्या कमी पडत असल्याची बाब पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांनी नजरेत आणून देत पोलीस ठाण्यास वाढीव पोलीस देण्याची मागणी केली.

शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर चेकपोस्ट सुरु करण्यात आले आहेत. तेथे नगर परिषदेने आपले अधिकारी तैनात केले आहेत. मात्र, पोलीस बळ नसल्याने तेथे काम करणे अवघड होत असल्याची बाब डॉ. मेनकर यांनी नजरेत आणून दिली.

त्यामूळे लॉकडाऊन काळासाठी वाढीव ३० पोलीस देण्यास अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी मान्यता दिली असल्याचे समजते. उद्या (दि.२३) किमान त्यातील २० अतिरिक्त पोलीस शहरासाठी मिळतील अशी चर्चा आहे.

‘निमा’त उद्या बैठक

माळेगांव औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यातील कामगारांना करोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर येऊ लागले आहे. यापूर्वी फ्लाय व्हिल रिंग गिअर, क्यूपिड लिमिटेडसह काही कारखान्यांमध्ये रुग्ण आढळले होते. त्यांचा इतरांनाही संसर्ग झाला होता. आता हिंदुस्थान युनिलिव्हरमधील १५ ते २० कामगारांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यातील अनेक कामगार सिन्नर शहरात राहतात तर तालुक्यातील सुळेवाडी, पाडळी, वडझिरे, निऱ्हाळे येथील कामगारही पॉजिटिव्ह निघाले आहेत.

या कामगारांच्या पाठोपाठ त्यांचे कुटूंबियदेखील पॉजिटिव्ह निघू लागल्याने सर्वांचीच चिंता वाढू लागली आहे. आता जुन्या मायलॉन कंपनीतही पॉजिटिव्ह कामगार निघाल्याची चर्चा असून या कंपनीतील कॅन्टिनमध्ये काम करणाऱ्या सेवकाला करोनाचा संसर्ग झाल्याचे समजते. त्यामूळे या कारखान्यात काम करणाऱ्या शहरातील अनेक कंत्राटी कामगारांना कंपनीने सुट्टी दिल्याची चर्चा आहे.

जिंदाल सॉ लिमिटेड मध्येही बाधित रुग्ण आढळल्याची चर्चा असून कारखान्यांमधील हा वाढता संसर्ग धोकादायक ठरण्याची भिती व्यक्त होत असल्याने उद्या (दि.२३ ) सकाळी १० वाजता निमाच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com