सिन्नर । Sinnar (प्रतिनिधी)

सतत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांची शहराध्यक्षपदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कोतवाल यांनी आघाडी सरकारच्या विरोधात ट्विट केले होते. मराठवाडा, विदर्भातील शेतकर्यांना राज्य शासनाने मदत केली होती. मात्र, जिल्ह्यातील शेतकर्यांना ही मदत मिळाली नसल्याचे कारण देत कोतवाल यांनी ट्विट केले होते. ते चुकीचे होते, असा आव्हाड यांचा आरोप आहे. पक्षाचे शहराध्यक्षपद भूषविणार्या जबाबदार पदाधिकार्याने आघाडी सरकार बरोबरच पक्षाची बदनामी करणे चुकीचे आहे.

त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. पक्षवाढी संदर्भात कोतवाल यांनी त्यांच्या कार्यकाळात कुठलेही प्रयत्न केले नाहीत. लोकसभा निवडणुकीत कोतवाल राहत असलेल्या प्रभागात पक्षाच्या उमेदवाराला केवळ तीन मते मिळाली होती. त्यानंतर कामकाजात सुधारणा करण्याबाबत कोतवाल यांना वेळोवेळी सूचित करण्यात आले होते.

मात्र, त्यानंतरही त्यांच्या कामकाजात कुठलाही फरक पडला नाही. उलट पक्षविरोधी कारवाया वाढल्याने त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घ्यावा लागल्याचे आव्हाड यांनी पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, कोतवाल यांच्याशी संपर्क साधला असता आपली बाजू ऐकून न घेता करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या कारवाईपूर्वी साधी कारणे दाखवा नोटीसही आपल्याला बजावण्यात आली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आघाडी सरकारबाबत बळीराजाच्या मनातला सूर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ट्विट केले होते. त्यात कोणाच्याही बदनामीचा विषय नव्हता. आपण कुठलीही पक्षविरोधी कारवाई केली नसताना शहराध्यक्ष पदाबरोबरच थेट पक्षातून हकालपट्टी करणे अन्याय करणारे आहे. केवळ ट्विट केले तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हे फळ मिळाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.