
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
तालुक्यातील देशवंडी ते महादेवनगर या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून (Pradhan Mantri Gramsadak Yojana) होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामाची चौकशी (Inquiry) करण्याची मागणी सरपंच दत्ताराम डोमाडे यांनी केली आहे. काम अर्धवट सोडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
देशवंडी ते महादेवनगर या पाच किमी अंतराच्या रस्त्याचे काम (road work) प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरु आहे. मात्र, सुरु असलेले हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. संबंधितांना ग्रामस्थांनी अनेक वेळा कामाचा दर्जा सुधारण्यासाठी सांगूनही सुधारणा झाली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या झालेल्या कामाची सध्या अवस्था अतिशय खराब झाली आहे.
रस्त्यावर डांबर कमी व खडीचे प्रमाण जास्त वापरल्याने या रस्त्यावर उदगळलेल्या खडीचे गंज साठले आहे. या खडीमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. सरपंच डोमाडे व ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा करुन सदर रस्त्याच्या कामास मंजुरी मिळविली.
मात्र, संबंधित ठेकेदाराने (Contractor) हा नवीन रस्ता बनविताना बांधकाम विभागाचे (Construction Department) सर्वच नियम धाब्यावर बसवत धातुरमातुर काम केल्याचा आरोप सरपंच डोमाडे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कापसे यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण कामाची संबंधित विभागाने चौकशी करावी व बनविलेल्या रस्त्याची नव्याने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.