शिवसेनेच्या दणक्यानंतर गायब ऑक्सिजन सिलेंडर पुन्हा अवतरले...

सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार; चौकशी करण्याची मागणी
शिवसेनेच्या दणक्यानंतर गायब ऑक्सिजन सिलेंडर पुन्हा अवतरले...

सिन्नर । प्रतिनिधी

एकीकडे ऑक्सिजनवाचून रुग्ण दगावत असतांना रुग्णालयातून भरलेले नऊ ऑक्सिजन सिलेंडर गायब झाल्याचा अजब प्रकार सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात घडला. शिवसेना कार्यकर्त्यांच्या लक्षात येतात सुरूवातीला माहीती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मात्र नगराध्यक्षांसह शिवसेना नेते कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केल्याने अखेर रिकामे म्हणून ड्रायव्हरने चुकुन कंपनीत नेले असल्याचे कारण देत रात्री 10 वाजेच्या सुमारास भरलेले सिलेंडर पुन्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

गुरूवारी (दि. 29) सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन तुटवडा सुरू झाला होता. याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी तत्काळ तहसिलदार राहुल कोताडे यांच्याशी संपर्क साधत ऑक्सिजन पुरवठ्याबाबत विचारणा केली.

मात्र उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पाठविला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर उपलबद्ध ऑक्सिजनबाबत रुग्णालयात जात माहीती घेतली असता तेथून नऊ भरलेले सिलेंडर गायब असल्याचा गंभीर प्रकार समोर आला.

याबाबत रुग्णालय प्रशासनास विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांसोबत रुग्णांच्या नातलगांनी देखील पोलिसांकडे तक्रारी केल्या. दोन दिवसापासून ऑक्सीजन नाही, सिलेंडरचा काळाबाजार होतो, डोळ्यादेखत माणसे मरत आहेत, फारसे लक्ष दिले जात नाही अशा तक्रारी रुग्णाच्या नातलगांनी बोलून दाखवल्या.

या गंभीर प्रकाराची दखल घेत शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक शैलेश नाईक, पंकज मोरे, श्रीकांत जाधव, ज्योती वामने, शहर प्रमुख गौरव घरटे, पिराजी पवार, रावसाहे आढाव आदींनी रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आंदोलनस्थळी येऊन कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तथापि अधिक्षिका डॉ. वर्षा लहाडे यांनी सत्य परिस्थितीचे उत्तर द्यावे अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी देखील आंदोलनस्थळी येत पोलिसांशी चर्चा केली.

दरम्यान, गायब झालेले सिलेंडर उत्पादक कंपनीचे कामगार रिकामे सिलेडर समजून घेऊन गेल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगण्यात आले. तसेच रात्री दहा वाजेच्या सुमारास पुरवठादाराकडून 15 ऑक्सिजन सिलेडर रुग्णालयात पाठविण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

एकीकडे ऑक्सिजन शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहे. तसेच ऑक्सिजन अभावी मागील रुग्णांना ेड मिळत नसल्याची स्थिती असतांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर रुग्णालयातून गाय होणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. या ेजबाबदार कारभाराची जबाबदारी निश्चित करावी. ऑक्सीजन सिलेंडर, रेमडिसिव्हिर इंजेक्शन आणि इतर औषधांचा रुग्णालयात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत असून याची पारदर्शक, सखोल चौकशी करून संंधितांवर कारवाई व्हावी.

उदय सांगळे, शिवसेना युवानेते

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com