सिन्नर : गाळ्यांचा करार वाढविण्याचा प्रयत्न फसला

मनेगावमधील जागरुक नागरिकांनी उधळून लावला डाव
सिन्नर :  गाळ्यांचा करार वाढविण्याचा प्रयत्न फसला

सिन्नर । प्रतिनिधी

मनेगाव ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 12 ऑगस्ट रोजी संपत असतांना शेवटच्या दिवशी ग्रामपंचायतीची बैठक लावत गाळ्यांचा करार वाढवण्याचा पदाधिकाऱ्यांचा डाव जागरुक नागरिकांनी उधळून लावला.

ग्रामपंचायतीच्या मालकीचे छत्रपती शिवाजी महाराज संकूल असून त्यातील 7 गाळे 6 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात आले होते. या गाळेधारकांचा भाडेकरार 30 ऑगस्ट 2016 रोजी संपला आहे. अनामत रकमेचा लिलाव करुन हे गाळे पुन्हा भाडेतत्वाने देण्यासाठी 2016 मध्येच ग्रामपंचायतीने पावले उचलायला हवी होती.

मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातून ग्रामपंचायतीचे नुकसान झाले असतानाही डोळेझाक करण्यात आली. मात्र, 12 ऑगस्टला विद्यमान सत्ताधाऱ्यांची मुदत संपत असताना शेवटच्या दिवशी घाईघाईने सकाळी 10.30 वाजता ग्रामपंचायतची तातडीची बैठक बोलवण्यात आली. त्यात या 7 गाळे धारकांनाच पुढील 11 महिण्यांसाठी हे गाळे भाडे कराराने देण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यास सेवानिवृत्त सैनिक संपत सोनवणे यांनी विरोध दर्शवत ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीत जाऊन घाईघाईने घेण्यात येत असलेला निर्णय चूकीचा असल्याचे सांगत ठरावास विरोध केला व ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन ग्रामसेवक व सरपंचास दिले. त्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन मावळत्या पदाधिकाऱ्यांना अधिकार नसताना शेवटच्या दिवशी केलेला ठराव रद्द करण्याची मागणी केली.

विशेष म्हणजे सकाळची 10.30 ची बैठक दुपारी 12 च्या दरम्यान संपली आणि सायंकाळी 5.30 पर्यंत सर्व 7 गाळेधारकांचे नूतन करारही करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 4 वर्षांपूर्वीच भाडेकरार झाला असता तर ग्रामपंचायतीला वाढीव अनामत रक्कम मिळाली असती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत घाईघाईने केलेल्या या ठरावात नेमका फायदा कोणाचा असा प्रश्न सोनवणे यांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com