अनंत चतुर्दशीच्या दिवशीच सव्वा किलो चांदीची गणेश मूर्ती लंपास

पोलिसांकडून शोध सुरू
अनंत चतुर्दशीच्या दिवशीच सव्वा किलो चांदीची गणेश मूर्ती लंपास

वावी | संतोष भोपी | Vavi

आज (दि. ०९) मध्यरात्री सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) वावी (Vavi) येथील ग्रामपंचायतीसमोर इच्छामणी व्यापारी ग्रुप वावी या गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातून सव्वा किलो चांदीची श्रींची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली...

आज पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान हा प्रकार लक्षात आला. ही घटना घडल्यानंतर वावी पोलिसांकडून (Police) शोध मोहीम राबवण्यात येत असून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार नाशिक येथून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही चौकशीसाठी दाखल झाले आहे.

वावी येथील ग्रामपंचायत संकुलासमोर इच्छामणी व्यापारी ग्रुप या गणेशोत्सव मंडळाचा गणपती गेल्या 14 वर्षांपासून स्थापन करण्यात येतो. मंडळाने आठ ते दहा वर्षांपूर्वी चांदीची सव्वा किलो वजनाची श्रींची मूर्ती बनवली असून उत्सवा दरम्यान ही मूर्ती मंडपात स्थापित करण्यात आली होती.

आज मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंडपाच्या पाठीमागच्या बाजूने पडदा वर करून प्रवेश केला व मूर्ती उचलून आल्या पावली परागंद झाले. मंडपाच्या दर्शनी भागात पडदा ओढला होता. तर दोन होमगार्ड शेजारीच खुर्चीवर बसलेले होते. त्यांना देखील या चोरीचा सुगावा लागला नाही.

ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेरात देखील चोरट्यांचा कुठलाही मागमुस दिसत नाही.सकाळी 6 वाजेच्या दरम्यान मंडळाचा कार्यकर्ता बाहेरील लाईट बंद करण्यासाठी आला असता त्याला गणपतीची चांदीची मूर्ती गायब असल्याचे आढळून आले. त्यांनी लागलीच बाहेर असलेल्या होमगार्डना ही माहिती दिली. तसेच बाजूच्या व्यापारी संकुलात असणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांनाही सांगितले. मूर्ती चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत परिसरात गर्दी केली होती.

वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक विजय सोनवणे पो.ह.नितिन जगताप, दशरथ मोरे यांनी तात्काळ धाव घेत घटना स्थळी भेट दिली. तसेच ग्रामपंचायतच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले. मात्र चोरट्यांचा कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही. या बाबत अधिक तापस विभागीय पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे स्वत दखल घेत घटना स्थळाची पाहणी केली.

गुन्हे शाखेचे पथक दाखल

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह आठ ते दहा जणांचे पथक वावीत दाखल झाले आहे. मंडळाच्या मंडपातून चांदीची मूर्ती चोरीला जाते हा प्रकार धक्कादायक आहे. पोलिसांकडून काही स्थानिक तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असले तरी त्यांच्याकडून कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले.

मंडपात मूर्ती असुरक्षित

पोलिसांकडून मंडळाला बंदोबस्त देण्यात आला असला तरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची देखील चांदीच्या गणेश मूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी होती. मात्र गेले दहा दिवस रात्रीच्या वेळी या मंडळाची व गणपतीची सुरक्षा तेथे नेमलेल्या दोघा होमगार्ड करवीच करण्यात येत होती. रात्री उशिरानंतर पहाटेपर्यंत मंडळाचा एकही पदाधिकारी गणेश मूर्ती ठेवलेल्या मंडपात उपस्थित राहत नव्हता किंवा चांदीच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी सभासदांच्या ड्युट्या देखील लावण्यात आलेल्या नव्हत्या. हा प्रकार चोरट्याला माहीत असल्यानेच त्याने संधीचा फायदा घेत मूर्ती लांबवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com