मोसमपुलावर सिंग्नल यंत्रणा कार्यान्वित

अपघातांचे प्रमाण घटेल : भुसे
मोसमपुलावर सिंग्नल यंत्रणा कार्यान्वित

मालेगाव | Malegoan

चोवीस तास वाहतुकीची वर्दळ असलेल्या मोसमपुलावरील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे वाहतुक व्यवस्था सुरळीत होवून अपघातांचे प्रमाण निश्चित घटतील असा विश्वास कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी येथे बोलतांना व्यक्त केला.

मनपा नगरसेवक अ‍ॅड. गिरीश बोरसे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मोसमपूल चौकातील वाहतुक सिग्नलचे लोकार्पण ना. भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

उपमहापौर निलेश आहेर, जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, मनपा आयुक्त त्र्यंबक कासार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, मनपा विरोधी पक्षनेत्या शानेहिंद निहाल अहमद, माजी उपमहापौर हाजी युनूस इसा, सखाराम घोडके, मुस्तकीम डिग्नीटी, भिमा भडांगे, नंदकुमार सावंत, एजाज बेग, शफीक अन्सारी, दिपाली वारूळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोसमपुलावरील सिग्नल यंत्रणेमुळे शहराच्या वैभवात भर पडल्याचे स्पष्ट करत ना. भुसे पुढे म्हणाले, नव्यानेच सुरू झालेल्या यंत्रणेमुळे वाहतुक व्यवस्थेवर प्रारंभी ताण पडेल. अनुभवातून यामध्ये आवश्यक त्या सुधारणा देखील करण्यात येतील. यामुळे वाहतुकीला चांगली शिस्त लागेल. सिग्नल यंत्रणेमुळे वाहतुक पोलीसांबरोबर नागरिकांवर देखील मोठी जबाबदारी राहणार आहे.

रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब व ट्रान्सफार्मर लवकरच स्थलांतरीत करून चौकाचे सुशोभिकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असेही ना. भुसे यांनी शेवटी सांगितले.

जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी सुरळीत वाहतुकीसाठी नागरीकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. नगरसेवक गिरीश बोरसे यांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल पाटील यांनी गौरवोद्गार काढले.

विकास निधीतून राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची देखभाल व दुरुस्तीसाठी मनपाने विशेष तरतूद करण्याची गरज आहे.

यामुळे उपक्रमांची योग्य निगराणी होवून जनतेला दिर्घकाळापर्यंत त्याचा लाभ मिळू शकेल या संदर्भात मनपाने लक्ष घालण्याचे आवाहन नगरसेवक अ‍ॅड. बोरसे यांनी प्रास्ताविकात केले.

यावेळी परिवहन अधिकारी किरण बिडकर, विरोधी पक्षनेत्या शानेहिंद निहाल अहमद, माजी उपमहापौर युनूस इसा आदींनी मार्गदर्शन करीत शहरवासियांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मोठ्या संख्येने नागरीक कार्यक्रमास उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com