देवमामलेदार रथावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

देवमामलेदार रथावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

सटाणा । प्रतिनिधी Satana

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या व अधिकारी, भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ( Devmamledar Shri Yashvantrao Maharaj )यांच्या 135 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त होणार्‍या यात्रोत्सवास भक्तिभावपूर्ण वातावरणात प्रारंभ केला गेला. यानिमित्त पहाटे मंदिरात देवमामलेदारांची महापूजा करण्यात आली. दुपारी काढण्यात आलेल्या रथ मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. माजी नगराध्यक्ष सुनील मोरे मित्रमंडळातर्फे मंदिरासह रथ मिरवणुकीवर हेलिकॅप्टरमधून भाविकांच्या हस्ते करण्यात आलेली पुष्पवृष्टी यंदा विशेष आकर्षण ठरले होते.

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरासह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येऊन फुलांनी मंदिर सुशोभित करण्यात आले होते. करोना संक्रमणानंतर प्रथमच यात्रोत्सवाचे आयोजन केले जात असल्याने भाविकांनीदेखील गर्दी केली होती. पहाटे मंदिरात शासकीय महापूजा पार पडली. तहसीलदार जितेंद्र इंगळे, सुप्रीया इंगळे, प्रांत अधिकारी बबनराव काकडे, अर्चना काकडे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरुणा बागड यांच्या समवेत देवस्थानचे विश्वस्त प्रवीण पाठक, वृंदा पाठक यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत महापूजा व महाआरती झाली. तसेच सटाणा न्यायालयात देवमामलेदार यांच्या काळातील ऐतिहासिक तिजोरीचे पूजन केले गेले. बागलाण तहसील कार्यालयात देवमामलेदारांच्या खुर्चीची तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी नायब तहसीलदार, तालुक्यातील सर्कल अधिकारी, तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस ठाणे आवारातील यशवंतराव महाराज मंदिरात पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी स.पो.नि. किरण पाटील, वर्षा जाधव यांच्यासह पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान उपस्थित होते. यात्रोत्सवानिमित्त पहाटे महापूजेसाठी आलेल्या भाविकांसाठी देवमामलेदार मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी फराळाचे आयोजन केले होते.

देवमामलेदारांच्या पुण्यतिथीनिमित्त निघालेल्या रथमिरवणुकीची पूजा तहसीलदार जितेंद्र इंगळे, पो.नि. सुभाष अनमुलवार, पालिका मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रांत अधिकारी बबनराव काकडे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, समको बँकेचे माजी चेअरमन श्रीधर कोठावदे, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, स.पो.नि. किरण पाटील, वर्षा जाधव यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त, व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. परंपरेनुसार रथ ओढण्याचा मान सटाणा पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना मिळाला.

शहराच्या मुख्य रस्त्यावरून निघालेल्या रथ मिरवणुकीत शहरासह तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लेझीम पथक, टिपरी नृत्य, बँड पथक या वाद्यांच्या गजरात भव्यदिव्य रथ मिरवणूक पार पडली. यावेळी बालगोपाळांनी विविध संतांचे जिवंत देखावे साकारले. माजी नगराध्यक्ष सुनील मोरे मित्रमंडळाने यशवंतराव महाराजांच्या मंदिरावर आणि रथ मिरवणुकीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली. रथ मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी दूध, चहा व फराळाचे वाटप करण्यात आले. रथ मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलले होते.

ठिकठिकाणी सुवासिनींनी रथाची पूजा करून स्वागत केले.रथोत्सवावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचा मान दोधा मोरे, जिजाबाई मोरे, शशिकांत कापडणीस, वैभव गांगुर्डे, वृषाली कुमावत, ऋषिका कुमावत, राशी सोनवणे, संतोष चौरे, किशोर सोनवणे, देवीदास साळवे, साई देवरे, सांरगी भदाणे, रिधीमा सोनवणे, मयूर बगडाणे, साहिला शेख, नयना पटुणे, राकेश खैरनार, संजय मैंद, वरद सोनवणे, प्रथमेश पवार, कोमलसिंग मोरकर, दीपक पाकळे, हेमंत भदाणे, पालकमंत्री दादा भुसे यांचे सुपुत्र आविष्कार भुसे, दीपक पाकळे, मयूर सोनवणे, अंबादास देवरे, कैलास येवला आदी भाविकांना मिळाला होता.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com