रेमडेसिवीर पाठोपाठ फॅबीफ्लू गोळ्यांचाही तुटवडा

रुग्णांसह नातेवाईकांची धावपळ
रेमडेसिवीर पाठोपाठ फॅबीफ्लू गोळ्यांचाही तुटवडा

नवीन नाशिक । Nashik

शहरासह नवीन नाशकात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णालयातील बेड फुल्ल झाल्याने अनेक रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातच उपचार घेत आहे. करोणाची हलकी आणि माध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी

करोना बाधिताला देण्यात येणाऱ्या फॅबीफ्लू गोळ्यांचाही तुटवडा निर्माण झाल्याने या गोळ्यांसाठी रुग्णांची तसेच नातेवाइकांची भटकंती सुरू झाली आहे.

करोना बाधित आढळला की डॉक्टर त्याला फॅबीफ्लू (फेब्यूफिरावीर) किंवा हेच घटक असणाऱ्या अन्य कंपन्यांच्या गोळ्या देतात. करोनावर सध्या जी औषधे दिली जात आहेत त्यात या गोळ्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते.

यात रुग्णांची लक्षणे कमी स्वरूपाची लक्षणे म्हणजेच ताप येत असल्यास रुग्णाला २००, तसेच ४०० मिलीग्रॅम च्या गोळ्या देण्यात येतात तसेच रुग्णाला तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास ८०० मिलीग्रॅम चा डोस देण्यात येतो. या गोळ्या गुणकारी ठरत असल्याने अनेक डॉक्टर या गोळ्यांवर अधिक भर देत आहेत. या गोळ्यांचे उत्पादन विविध कंपन्या करीत असल्या तरी ग्लेनमार्क कंपनीच्या गोळ्यांना अधिक मागणी आहे.

रेमडेसिव्हिर आणि टोसिलिझूम हे थेट जिल्हाधकाऱ्यांमार्फत हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतात, मात्र फॅबीफ्लू या गोळ्या मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर उपलब्ध आहेत. सध्या रेमडेसिव्हिर आणि टोसिलिझूमचा तुटवडा असल्यामुळे पर्यायाने फॅबीफ्लूची मागणी वाढली असल्याने शहरासह नवीन नाशकात मेडिकल स्टोअर वर या गोळ्या उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नातेवाईकांना या गोळ्या मिळवण्यासाठी मोठ्याप्रमाणात भटकंती करावी लागत आहे. तसेच काही औषध विक्रेते ज्यादा किमतीत फॅबीफ्लू देत असल्याचे रुग्णांकडून बोलले जात आहे.

सद्यस्थितीत उत्पादकांकडून फॅबीफ्लूचा स्टॉक कमी प्रमाणात येत आहे, मागणी वाढल्यामुळे पुरवठाही कमी होतो जसा पुरवठा होतो त्या प्रकारे वितरण सुरू आहे.

- गोरख चौधरी, (जिल्हाध्यक्ष नाशिक केमिस्ट संघटना)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com