नाशिक । Nashik

नायलॉन मांजा प्रकरणी शोधाशोध करून किरकोळ लोकांवर कारवाई करण्याऐवजी मांजाची निर्मिती व वितरण अशी पाळेमुळे खोदून काढण्यावर पोलीसांचा भर राहिले तसेच विक्री करताना सापडलेल्या दुकानदारांच्या दुकानाचा परवाना रद्द व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी स्पष्ट केले.

जीवघेणा नायलॉन मांजा बंदी असताना सर्रास आढळून येतो. मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होते. पर्यावरणास घातक असलेल्या नायलॉन मांजामुळे पशु पक्ष्यांची जीवित हानी होतेच, नागरिक गंभीर जखमी होतात. मात्र आता यामुळे मनुष्यहानी सुद्धा झाली आहे.

हिरावाडीतील भारती जाधव या महिलेचा नायलॉन मांजाने गळा कापून मृत्यू झाला. शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणार्याविरोधात कडक भुमिका घेतली असून, शेकडो मांजाचे रिळ जप्त करण्यात आले आहे. मात्र दरवर्षी जप्तीबाबत हेच चित्र असते.

पत्रकार परिषदेत याबाबत पोलिस आयुक्तांना विचारणा केली असता त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. नायलॉन मांजाच्या विक्रीस बंदी असताना त्याची विक्री करणार्या दुकानदारांना पकडले जाते. मात्र ही कारवाई आता एवढ्यावरच थांबवणार नाही. या दुकानदारांचे परवाने रद्द करावेत अथवा ते निलंबीत करण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.

तसेच यासाठी पाठपुरावा सुद्धा केला जाईल. दुसरीकडे हा नायलॉन मांजा उत्पादीत कोठे होते, त्याचे वितरण कसे चालते याचाही तपास हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नायलॉन मांजाची विक्री थांबविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, त्याचे परिणाम सुद्धा दिसून येत असल्याचे त्यांनी स्षष्ट केले.