
नाशिक | Nashik
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील शिवसेनेचे बरेचसे नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांशी वन टू वन चर्चा करत मार्ग काढला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राऊत एका लग्न सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये येत आहेत...
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला राऊत हजेरी लावणार आहेत. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, या विवाह सोहळ्याकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देखील सहकुटुंब आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच या विवाह सोहळ्यासाठी राऊत यांच्यासह विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह आदी नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.