नाशिक | प्रतिनिधी

केंद्रात फडणवीसांचे सरकार आहे. त्यांच्याकडे पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी काही उपाययोजना असतील तर त्यांनी जरूर सुचवाव्यात. मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा निर्णय मुख्यमंत्री नक्की घेतील. असे आव्हान शिवसेना नेते आणि खासदार संजय राउत यांनी देवेन्द्र फडणवीस यांना दिले आहे.

नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेस संबोधित करताना खा. राउत बोलत होते. ते म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन गांभीर्याने घेतलेले नाही. कायदे ज्यांच्यासाठी बनवले आहेत. त्यांना जर ते नको आहेत तर त्यात काहीतरी चुकीचे असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे. यातून मार्ग काढला गेला नाही तर शेतकरी आणखीही आक्रमक होण्याची शक्यता दिसून येत आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने दोन पावले मागे यावे. केंद्र सरकार बहुमताचा फायदा घेत असल्याचा घणाघात खा राऊत यांनी केला.

महाराष्ट्रातील पेट्रोल दरवाढीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार इंधन दरवाढ करत असल्याचे वक्तव्य केले होते. या प्रश्नाचे उत्तर देताना खा. राऊत म्हणाले की, फडणीस यांचे केंद्रात सरकार आहे. पेट्रोल दरवाढ का झाली आहे हे सर्वांना माहिती आहे.

जर फडणवीस यांच्याकडे पेट्रोल दरवाढ थांबविण्याची काही उपाययोजना असेल तर त्यांनी जरूर ती मांडली पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी मुख्यमंत्री नक्की विचार करतील. असे खा. राऊत म्हणाले.

तसेच शेतकऱ्यांचे आंदोलन हिंसक झाल्यास त्याला सर्वस्वी जवाबदार केंद्र सरकार राहील असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

याप्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार हेमंत गोडसे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, वसंत गिते, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, राजू लवटे, जयंत दिंडे, रमेश धोंगडे, सत्यभामा गाडेकर, योगेश घोलप, जगन आगळे आदी उपस्थित होते.