Video : नाशकात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात

विविध कार्यक्रमांची रेलचेल
Video : नाशकात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात

नाशिक । Nashik

सह्याद्रीच्या कडेकपारी नाद गुंजतो वारंवार, शौर्य गाजवून गेली माझ्या शिवबाची तलवार.. अशा असंख्य घोषणांनी नाशिक शहर परिसर दणाणून गेला आहे. औचित्य आहे ते अर्थात शिवजयंतीचे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण नाशिक शहर सजले आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक स्वागत कमानी, भगव्या झेंड्यांनी सजल्या आहेत. शिवरायांनी गाजवलेला पराक्रम, ज्वाज्वल्य इतिहास आणि त्यांच्या आयुष्यातील ठळक प्रसंगांची आठवण ठिकठिकाणी देखाव्यात सादर करण्यात आली आहे. नाशिकरोड, देवळालीगाव, विहितगाव, जेलरोड, पंचवटी, सिडको, सातपूर परिसरात शांततामय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती सेनेतर्फे सीबीस येथे भव्य शिवरायांची टाक उभारण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून छत्रपती सेनेतर्फे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी टाकीच्या स्वरूपात त्यांनी शिवरायांची प्रतिकृती उभारली आहे. हा टाक ८ फुटी असून लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली आहे. याठिकाणी छगन भुजबळ यांनी भेट त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

तर नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीने यंदा येथील मुख्य शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती भव्य अशी किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे. ही भगव्या रंगाची किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून, आकाशात फुगेही सोडण्यात आले होते.

याचबरोबर शिवशाहीर यशवंत महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम, एसएमबीटी रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, शंभुनाद ढोलपथक गर्जना, रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन, सप्तखंजिरीवादक सत्यपालसिंह महाराज यांचे कीर्तन, रक्तदान शिबिर, वारी सोहळा, शिवनेरी सायकल वारी, मराठमोळी परंपरा आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांचे मार्गदर्शन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पंचवटी कारंजा येथे उभारण्यात आलेल्या भव्य किल्ल्याचा आणि अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा देखावा प्रमुख आकर्षण ठरत आहे. रस्त्यावरील पथदीपांच्या खांबावर भगवे ध्वज उभारण्यात आलेले आहेत. ठिकठिकाणच्या चौकांमध्ये तसेच गाडगे महाराज पुलावर भगव्या झालरी लावण्यात आलेल्या आहेत.

पंचवटी कारंजा येथे स्टिल, लाकूड व फायबर यांचा वापर करून सुमारे ६५ फूट उंचीचा किल्ला उभारण्यात आला होता. पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे सकाळी १० वाजता ढोल पथकांची मानवंदना, जिजाऊ वंदना आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com