नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाशिवरात्र (Mahashivratri )मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी शिवभक्त सज्ज झाले आहेत. आज बहुतांशी भाविक उपवास करत असल्याने उपवासाची बाजारपेठ चांगलीच बहरली आहे. शिवमंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई व रंगरंगोटी करून भव्य सजावटही करण्यात आली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. घराघरांत उपवास केला जाणार असल्याने बाजारात साबुदाणा, शेंगदाणा, राजगिरा, खजूर आणि फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. बाजारात कौट, रताळे, केळी, पेरू, मोसंंबी, पपई, द्राक्ष मोठ्या प्रमाणावर आली आहेत. या दिवशी खजूर, राजगिरा लाडू, चिक्कीला मागणी हमखास वाढते.
बाजारपेठेत 120 रुपये किलोपासून खजूर उपलब्ध असून गुणवत्तेनुसार 300 रुपये प्रतिकिलोपर्यंतचे खजूर आहेत. द्राक्षांसह विविध हंगामी पेरू, चिकू, पपई, सफरचंद यांना मागणी वाढली आहे. सफरचंदाची आवक मर्यादित असल्याने दर 120 रुपये किलोपासून पुढे आहेत. पेरूचे दर 60 ते 80 रुपये किलो, पपईचे दर 40 रुपये किलो आहेत. याशिवाय स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्री, डाळिंब, चिक्कूचीही जोरदार खरेदी सध्या ग्राहकांकडून होत आहे.
कौटही 10 ते 15 रुपयांना एक मिळत आहे. या दिवशी शिवाला उसाच्या रसाचा अभिषेक व रसपान याला महत्त्व असल्याने रसवंती गुर्हाळेही सज्ज झाली आहेत. कपालेश्वर, सोमेश्वर, टाळकुटेश्वर, नारोशंंकर, सिद्धेश्वर, तसेच पंचवटीतील कैलास मठ या मंदिरांत विविध कार्यक्रम होणार आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर 24 तास खुले राहणार आहे. तेथे जाण्यासाठी जादा बसेसची व्यवस्था केली आहे.
अध्यात्मिक चित्रप्रदर्शन, ज्योतिर्लिंग मेळा
महाशिवरात्री पर्वानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांची प्रतिकृती असलेला मेळा व अध्यात्मिक नवविश्व निर्माण चित्रप्रदर्शन आयोजन केले आहे. कौशल्येश्वर महादेवनगर, दीपालीनगर, नाशिक येथे दि. 17 ते 19 फेब्रुवारीदरम्यान हा तीन दिवसीय मेळा होत आहे. या चित्रप्रदर्शन व मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी दि. 17 रोजी सायं 6 वाजता संस्थेच्या जिल्हा मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंतीदीदी, राणेनगर मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वीणादीदी, नगरसेवक यशवंत निकुळे आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
या चित्रप्रदर्शनाद्वारे ताणतणावमुक्त जीवन, मन:शांती, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, शिव आणि शंकर दोघांमधील फरक, सृष्टीचक्राविषयी सखोल माहिती, शिवपरमात्मा अवतरण इत्यादीबाबत सखोल माहिती देत राजयोग (मेडिटेशन)चे फायदे नि:शुल्क सांगितले जाणार आहेत. यावेळी महाशिवरात्री पर्वानिमित्त नाटिका सादर केली जाणार आहे.
तरी सर्व भाविकांनी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राणेनगर राजयोग सेवा केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी वीणादीदी यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी कावेरीदीदी, ब्रह्माकुमारी चंदादीदी, ब्रह्माकुमारी उज्ज्वलादीदी तसेच ब्रह्माकुमारीज राणेनगर, सिडको भागातील संस्थेचे साधक, स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
ऋतुरंगची अनोखी शिववंदना
नाशिकरोड, प्रतिनिधी । नाशिकरोड येथील ऋतुरंग परिवारातर्फे महाशिवरात्रीनिमित्त नृत्य व गायनाच्या माध्यमातून शिववंदना हा कार्यक्रम दत्तमंदिर चौकातील ऋतुरंग भवनमध्ये शनिवारी (दि.18) सायंकाळी साडेसहाला होणार आहे. शिवाच्या भक्तीसाठी हरिद्वार, उज्जैन, माहेश्वर आदी ठिकाणी नृत्य व गायनाच्या माध्यमातून शिवरात्रीचे कार्यक्रम होतात. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये अशा प्रकारचा हा कार्यक्रम प्रथमच होत आहे. गरिमा चव्हाण, ओंकार पाटील हे नृत्य तर ईशा जोशी, संतोष जोशी गायन सादर करतील. तन्वी अमित यांचे निवदेन राहील. तबल्यावर संकेत फुलतानकर तर सिंथेसायजरवर चिन्मय कुलकर्णी साथ देणार आहेत. शिववंदनेसाठी रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऋतुरंग परिवाराने केले आहे.
देवळालीत विविध कार्यक्रम
देवळाली कॅम्प । परिसरातील विविध शिवमंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक संघटनांच्या वतीनेही ठिकठिकाणी फराळाचे वाटप केले जाणार आहे. आज मनोकामेश्वर महादेव मंदिर, गवळीवाडा येथे मंदिरात पहाटे 5 ते 6 स्वअभिषेक व शिवलिंग महापूजा व सकाळी 7 ते 8 महाआरती, दुपारी 12 वाजता महाआरती, 4 ते 5 महिला भजनी मंडळाचे भागवत, रात्री 8 ते 9 महाआरती व शिवलिंग पूजा तसेच सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
वॉर्ड क्र. 2 मधील वडनेर रोडवरील विद्या विनय सोसायटीतील श्री विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम होणार असून त्यात पूजा, आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. भगूर-देवळाली रस्त्यावरील प्रसिद्ध रेणुका माता मंदिर परिसरात रेणुका माता सोशल ग्रुपच्या वतीने सकाळी पूजन व फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब कासार, दिनेश गोविल, धर्मेंद्र कुकरेजा, नवीन नागपाल, सतीश परदेशी, भरत ताजने, संजय ताजणे, रोहित कासार, राजू पाटील, प्रज्वल आव्हाड, अमोल कासार, सुभाष आव्हाड आदींनी केले आहे.