नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील ग्रामपंचायत ते महानगरपालिका निवडणुकांत आता शिवसेनेचा भगवा फडकणार असून यादृष्टीने पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन राज्यमंत्री दादा भुसे यांनी आज पदाधिकार्यांच्या बैठकीत केले.

आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीच्या संदर्भात निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी आज तातडीची पदाधिकारी बैठक भुसे यांच्या अध्यक्षतेखाली व संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत झाली.

याप्रसंगी भुसे बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात तातडीचे नियोजन करण्याचे ठरवण्यात आले. यात गाव, तालुका व शहर या तीनही स्तरावरील शिवसेना पदाधिकार्यांकडून आढावा घेण्यात आला. तसेच संघटनात्मकदृष्ट्या शिवसैनिकांच्या बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

गेल्या वर्षभरात संपूर्ण जगाला करोनाने ग्रासलेले असताना महाराष्ट्र सरकारने केलेल्या अनेक महत्त्वाच्या उपाययोजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाची स्वतंत्र टीम तयार करण्यात येणार असल्याचेही यावेळी पदाधिकार्यांनी सांगितले. दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तालुकानिहाय विकासकामांसाठी तालुक्यातील शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री व संबंंधित खात्यातील मंत्र्यांना भेटून प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही पदाधिकार्यांनी सांगितले.

या बैठकीला जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आ. सुहास कांदे, नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार अनिल कदम, योगेश घोलप, काशिनाथ मेंगाळ, निर्मला गावित, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, मनपा गटनेते विलास शिंदे, उदय सांगळे, मोहन गांगुर्डे, भास्कर गावित आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा संपर्कमंत्री म्हणून दादाजी भुसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच विजय करंजकर यांची विधान परिषदेला आमदार म्हणून शिफारस केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित नाशिक महानगरप्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या बैठकीचे सूत्रसंचालन विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केले.

शिवसेनेचा भरणार जनता दरबार

जिल्ह्यातील नामदार, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख, विरोधी पक्षनेते हे शिवसेना कार्यालयात ठरवून दिलेल्या दिवशी बसणार आहेत. यावेळी जनता दरबार भरवण्यात येणार असून यात जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यात येणार आहेत. या जनता दरबारासंदर्भात शिवसेना पदाधिकार्यांनादेखील मार्गदर्शन केले जाईल.