तालुक्यात 23 ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा; निमगाववर माजी जि. प. अध्यक्ष हिरेंचे वर्चस्व कायम; शिवसैनिकांचा जल्लोष

तालुक्यात 23 ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा; निमगाववर माजी जि. प. अध्यक्ष हिरेंचे वर्चस्व कायम; शिवसैनिकांचा जल्लोष

मालेगाव । Malegaon (प्रतिनिधी)

ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत बाह्य मतदार संघातील 34 पैकी 23 ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले तर रावळगाव, खाकुर्डी, टेहरे, टाकळी या प्रमुख ग्रामपंचायतीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. तालुक्याचे लक्ष लागलेल्या निमगाव ग्रामपंचायतीवर माजी जि. प. अध्यक्ष मधुकर हिरे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे.

मालेगाव तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज शांततेत पार पडला. तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली 50 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निवडणूक प्रक्रिया राबवली. काही ग्रामपंचायतीत बिनविरोध तर काही ठिकाणी हात उंचावून मतदान प्रक्रिया घ्यावी लागली. निकाल जाहीर होताच समर्थकांतर्फे गुलालाची उधळण करण्यात येवून जल्लोष केला जात होता. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. संवेदनशील ग्रामपंचायतींवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

निमगाव सरपंचपदी सरला जगताप

तालुक्याचे लक्ष लागलेल्या निमगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे माजी जि.प. अध्यक्ष मधुकरबापू हिरे यांची सत्ता कायम राहिली आहे. सरपंचपदी सरला तुषार जगताप तर उपसरपंचपदी आकाश मधुकर हिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 15 पैकी 13 सदस्य कर्मवीर शिवराम दादाजी हिरे पॅनलचे निवडून आले होते.

ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरपंच पदासाठी जगताप तर उपसरपंच पदाकरिता हिरे यांचेच नामांकन दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत केली गेली. निकाल जाहीर होताच हिरे समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला. यावेळी पॅनल नेते मधुकर हिरेंसह सरपंच सरला जगताप, उपसरपंच आकाश हिरे यांच्यासह सदस्यांनी कर्मवीर शिवराम हिरे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

यावेळी झालेल्या सभेत मार्गदर्शन करतांना मधुकर हिरे यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. विरोधकांनी ग्रामस्थांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. परंतू ग्रामस्थांनी कर्मवीर शिवराम दादा हिरे पॅनलला प्रचंड मतांनी निवडून देत विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सदस्यांनी गावात विविध विकासकामे आगामी काळात करावी, असे आवाहन हिरे यांनी केले.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंचांचा हिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा.पं. सदस्य अरुण हिरे, दशरथ हिरे, निंबा हिरे, शरद ठाकरे, योगिता नंदाळे, भारती हिरे, शिला हिरे, रुपाली अहिरे, ऊर्मिला पाटील, सुनंदा हिरे, रेखा हिरे, मिना हिरे यांच्यासह चिंतामण हिरे, दुर्गादास नंदाळे, वसंत हिरे, दत्तात्रय हिरे, संदीप गाढे, निवूत्ती मोरे, अरुण पाटील, बापू हिरे, शांताराम हिरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडेल सरपंचपदी नरेंद्र सोनवणे

वडेल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सेनेचे नरेंद्र लोटन सोनवणे तर उपसरपंचपदी प्रमिला ताराचंद महाले यांची आज झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून एस.टी. खरे यांनी काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी पी.बी. वाघ, तलाठी मोरे यांनी सहकार्य केले. ग्रामपंचायतीवर सलग दुसर्‍यांदा भगवा फडकताच शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला.

आघार बु. सरपंचपदी सीमा हिरे

आघार बु. ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंचपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. शिवसेनेच्या सीमा रामचंद्र हिरे यांना 6 मते मिळाल्याने त्या सरपंचपदी विजयी झाल्या. अनिल हिरे यांना 4 मते मिळाल्याने पराभव पत्करावा लागला. उपसरपंचपदी सेनेचे विनायक पोपट बागुल यांना 6 मते मिळाल्याने निवडून आले. दीपक सावंत यांना 4 मते मिळाल्याने पराभव पत्करावा लागला. 11 पैकी 10 सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. शितल खरे ही सदस्या तटस्थ राहिली. बैठकीस कैलास हिरे, स्नेहल अहिरे, अनीता माळी, सतिष हिरे, अनिल अहिरे, अलका सावंत, कविता वाघ आदी सदस्य उपस्थित होते. निकाल जाहीर होताच सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

अजंग सरपंचपदी शहाबाई देवरे

अजंग ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंचपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सेनेच्या शहाबाई लालचंद देवरे यांना 8 मते मिळाल्याने त्या सरपंचपदी निवडून आल्या. राष्ट्रवादीचे तेजस अहिरे यांना 7 मते मिळाल्याने पराभव पत्करावा लागला. उपसरपंच पदासाठी सेनेचे गोकुळ बाळू सूर्यवंशी 9 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादीच्या वैशाली योगेश बच्छाव यांना 6 मते मिळाल्याने पराभव पत्करावा लागला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय पाटे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायतीवर तिसर्‍यांदा भगवा फडकविण्यास सेनेला यश आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com