शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षे राहणारच : संजय राऊत

शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षे राहणारच : संजय राऊत

नवीन नाशिक | Nashik

राज्याचे मुख्यमंत्री पद हे संपुर्ण पाच वर्ष शिवसेनेकडे राहील यासंदर्भात आघाडी सरकारमध्ये बोलणे झाले असून इतरांनी त्याबाबत चिंता करू नये, असे मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्याकरीता सध्या राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी सांगितले की महाविकास आघाडी मध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत व विरोधक कुठल्याही प्रकारचे राजकारण करीत असले तरीदेखील पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहणारच.

मनपा निवडणुकी अवघ्या वर्षावर येऊन ठेपल्या आहेत या पार्श्‍वभूमीवर अद्यापपर्यंत वार्ड पद्धती जाहीर झालेल्या नसून येत्या एक-दोन दिवसांमध्ये त्याचा निर्णय घेतला जाईल असेही राऊत यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणावर बोलताना त्यांनी सांगितले की, आरक्षणाचा निर्णय हा संसदेत असल्याने मराठा आंदोलकांनी मोर्चा काढायचाच असेल तर दिल्लीत काढावा याचा निर्णय तेथेच होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली हे तर सर्वांनाच ठाऊक असेल असेही त्यांनी सांगितले. स्वाभिमानाचे दुसरे नाव म्हणजे 'बाळासाहेब ' होते त्यांची शिवसेना अद्यापही स्वाभिमान जपून आहे. यामुळे विरोधकांनी त्याची चिंता करू नये व आरोप करताना आपले भान ठेवावे असेही त्यांनी सांगितले.

फडणवीसांनी केलेले वक्तव्य असे होते की, 2024 ला मोदी पुन्हा पंतप्रधान होणार यावर राऊत यांनी सांगितले की, आम्ही कुठे नाही म्हणालो असे सांगत फडणवीसांना कदाचित यावर विश्वास नसावा असाही टोला त्यांनी लगावला. नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून त्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहणार आहे.

सध्या पक्षाची बांधणी करण्याकरता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भेटी सुरू असून आगामी काळात दिशा व मार्गदर्शन केले जाईल तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई कोकणासह नाशिकचे ही खूप मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले सध्या शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सत्ता जरी आपली असली तरी कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा दौरा करत असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच सध्या शिवसेना पक्षात घडी बसलेली असून अंतर्गत बदलाची काही आवश्यकता वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्या मिशीला हात लावण्याचे वक्तव्य केले होते त्याला प्रत्युत्तर देत वाघाच्या मिशी ला हात लावायला हिम्मत लागते असा सज्जड दम देखील राऊत यांनी दिला.

यावेळी कृषी मंत्री दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, आमदार नरेंद्र दराडे, सुहास कांदे,अजय बोरस्ते, विलास शिंदे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com