शिवभोजन केंद्रांमुळे गरीब जनतेला दिलासा : कृषीमंत्री भुसे

शिवभोजन केंद्रांमुळे गरीब जनतेला दिलासा : कृषीमंत्री भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शिवभोजन केंद्र ( Shivbhojan Centers ) योजनेमुळे राज्यातील गरीब जनतेला दिलासा देण्याचे चांगले काम उभे राहिले असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांनी येथे बोलताना केले.

कॅम्प परिसरातील सोमवार बाजारातील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमहापौर नीलेश आहेर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, नगरसेवक भीमा भडांगे, राजेश गंगावने, संजय दुसाने, रामा मिस्तरी, किरण छाजेड, पिंटू कर्नावट, दीपक मेहता, हरी निकम, विशाल पाटील, प्रमोद पाटील, चैत्राम पवार, दीपक भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

निर्धारित थाळ्यांपेक्षा अधिकांना लाभ देऊन पुण्याचे काम शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून घडत आहे. गोरगरिबांसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत लाभ शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून देण्यात येतो. गुरुराम शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या या शिवभोजन केंद्रामार्फत शासनाने 100 थाळ्या निर्धारित केल्या असल्या तरी या केंद्रावर दर दिवसाला 200 ते 250 थाळ्यांचे वितरण करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. या माध्यमातून एकही नागरिक उपाशी राहणार नाही असे नियोजन केल्यामुळे ते निश्चितच कौतुकास पात्र असल्याचेही भुसे यांनी यावेळी नमूद केले.

करोना संकटकाळात जय आनंद ग्रुपने शहरातील सहा रुग्णालयांतील करोनाबाधित रुग्णांना सकस नाश्ता या संस्थेने जवळपास 75 दिवस मोफत पुरवून आपल्या सेवाभावी उपक्रमाची पावती दिल्याचे सांगताना भुसे म्हणाले, कुठलेही व्यावसायिक तत्त्व न बाळगता मोसम पुलावरील शिवभोजन केंद्रामार्फतही करोनाकाळात गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन शिवभोजन पुरवणारी टीम नक्कीच कौतुकास पात्र आहे.

कॅम्प परिसरात येणार्‍या ग्रामीण भागातील नागरिकांना या शिवभोजन केंद्राचा नक्कीच आधार मिळेल, असा विश्वासही भुसे यांनी यावेळी व्यक्त केला. मुंगसे बाजार समितीमार्फतही येणार्‍या शेतकर्‍यांना अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण देण्याचे काम अविरतपणे सुरू असून या सेवाभावी उपक्रमास सहयोग देणार्‍या सर्व सहकार्‍यांचे भुसे यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com