नाशिक । Nashik

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या भारतीय लढाऊ विमाने बनवणार्या कंपनीचा कर्मचारी दिपक शिरसाट याने हनीट्रॅपमध्ये फसून पाकिस्तानला पाठवलेली माहिती अतिशय गोपनीय व संवेदनशील होती. यामध्ये भारतीय वायु दलातील लढाऊ विमानात वापरण्यात येणारे मिसाईल व लाँचरबाबत तांत्रिक माहिती देखील पुरवल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

शिरसाट याच्या जामीन अर्जावर आज जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यात सरकारी पक्षातर्फे दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयात दीपकने पाकिस्तानस्थित लोकांना गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवल्याबाबत न्यायालयात पुरावे सादर केले.

त्यात दीपकने पाकिस्तानला पुरवलेली माहिती मिळवणे अतिशय अवघड असतानाही ती माहिती मिळवून पाकिस्तानला पाठवली. त्यामुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेस ही बाब घातक आहे. त्यामुळे दीपकला जामीन देऊ नये असा युक्तीवाद अॅड. मिसर यांनी केला. त्यात दोन्ही पक्षांकडील युक्तीवाद ऐकून न्यायालयाने दीपकचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

व्हॉट्सअप वरुन ओळख झालेल्या पाकिस्तानमधील एका महिलेसोबत शिरसाट याने संवाद साधण्यास सुरुवात केली होती. ओळख झाल्यानंतर त्याने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) येथील प्रतिबंधीत क्षेत्राची व तेथे तयार केले जाणार्या सुखोई विमानांची तसेच त्यांच्या भागाची व इतर सुरक्षा संबंधीत गोपनीय व संवेदनशील माहिती सोशल मीडियावरुन महिलेस पुरवली.

हा प्रकार लक्षात येताच दहशतवाद विरोधी पथकाने दीपक शिरसाट यास पकडले. त्यास न्यायालयाने सुरुवातीस पोलीस कोठडी सुनावलेली होती. त्यात दीपकने पाकिस्तानस्थित व्यक्तींना गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवल्याचे समोर आले. त्यानंतर दीपक याची रवानगी कारागृहात करण्यात आली. दरम्यान, दीपकने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.