महिला रुग्णांची गैरसोय : दोषींना वाचविणाऱ्यांना दणका; 'सीईओ'नी अहवाल फेटाळला

महिला रुग्णांची गैरसोय : दोषींना वाचविणाऱ्यांना दणका; 'सीईओ'नी अहवाल फेटाळला

नाशिक । प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीरप्रसंगी बेडअभावी महिला रुग्णांची गैरसोय झाल्याप्रकरणी आरोग्य विभागाने अहवाल सादर केला.

या अहवालात आरोग्य विभागाने संबंधितांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र, रूग्णांना सुविधा पुरविण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरल्याचे निष्पन्न होत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी हा अहवाल फेटाळत, संबंधितांना नोटीसा बजाविण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिला आहे. यामुळे दोषींना वाचविणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबकल्याण नसबंदी शस्त्रक्रिया उद्दिष्टपूतीर्साठी एकाच दिवसात तब्बल ४२ महिलांवर अवघ्या पाच तासांत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

शस्त्रक्रियेनंतर वार्डमध्ये अपुरी जागा असल्याने तसेच पुरेसे बेड नसल्याने या महिलांना एकाच हॉलमध्ये फरशीवर डाबण्यात आल्याचे प्रकार गेल्या आठवडयात जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपाजंली माळेकर यांनी समोर आणला होता.

या प्रकरणामुळे आरोग्य विभाग व्यवस्थेची ऐसीतैशी उघड झाली होती. यात माळेकर यांनी चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यकार्यकारी अधिकारी बनसोड यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्या समितीस चौकशीचे आदेश २२ जानेवारी रोजी दिले होते.

या चौकशीचा अहवाल तात्काळ सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. या आदेशान्वये डॉ. साळवे यांनी चौकशी करून आपला अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांना सादर केला. डॉ. आहेर यांनी सोमवारी अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी बनसोड यांना सादर करण्यात आला.

सदर अहवालात आरोग्य केंद्रात ४१ महिला रूग्णांना बोलाविण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. सदर महिलांनी स्वत:हून शस्त्रक्रियेसाठी गर्दी केली होती. साधारण नाव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्यात या पट्ट्यात शस्त्रक्रियेसाठी महिलांची गर्दी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यात महिलांना शस्त्रक्रियेनंतर कोणताही त्रास झालेला नाही. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना बेड देण्यात आलेले होते. परंतू, त्यांच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती अशा बाबी नमूद केल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाºयांचा बचाव करणार हा अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी बनसोड यांनी फेटाळून लावला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला रूग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यास संबंधित यंत्रणा कमी पडली आहे. महिलांची गैरसोय झालेली नसली तरी, एकाच हॉलमध्ये महिलांना झोपविणे चूक असल्याचे सांगत संबंधित यंत्रणेने दिरगांई केलेली असल्याचे बनसोड यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी बनसोड यांनी तात्काळ आरोग्य यंत्रणेतील सर्व संबंधितांना नोटीसा बजाविण्याचे आदेश डॉ. आहेर यांना दिले आहेत.

तीन वर्षांची मागविली माहिती
दरम्यान, मुख्यकार्यकारी अधिकारी बनसोड यांनी या प्रकरणी कडक पवित्रा घेतला असल्याचे समजते. आरोग्य विभागाची दिरंगाई दिसत असल्याने त्यांना नोटीसा बजाविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आरोग्य केंद्रावर गेल्या तीन वर्षात झालेल्या कुंटुंबकल्याण शस्त्रक्रियेची संपूर्ण माहिती अहवाल मागविला असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय बिगर अदिवासी तालुक्यांमधील आरोग्य केंद्रांमधील शस्त्रक्रियांचा अहवाल तुलनात्मक अभ्यासासाठी आरोग्य विभागाकडून मागविण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. सदर अहवालानंतर या प्रकरणाचा तुलनात्मक अभ्यास करणे शक्य होऊन दोषींचा शोध लागण्यास मदत होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com