नाशिक : लवकरच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर दावा करणार; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा इशारा

नाशिक : लवकरच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर दावा करणार; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा इशारा

नाशिक | Nashik

दोन दिवसांपूवी शिवसेना ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर राऊत यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. यानंतर आज शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांवर निशाणा साधला आहे...

यावेळी शिंदे गटाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे (Bunty Tidme) म्हणाले की, तुम्ही शिवसैनिकांना ओळखत नाहीत, तुम्ही शनिवार, रविवार फक्त हिशोब घ्यायला येतात. आत्तापर्यंत तुम्ही तेच केले यायचं हिशोब घ्यायचा आणि पैसे घेऊन परत जायचे असे त्यांनी सांगितले.

तसेच खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचे कटकारस्थान संजय राऊत यांचेच होते. या अनैसर्गिक युतीला राऊत कारणीभूत असून सत्ता असतांना देखील आम्ही साध्या शिपायाची बदली करू शकत नव्हतो, असे त्यांनी म्हटले.

तर माजी नगरसेवक अजय बोरस्ते (Ajay Borste) म्हणाले की, संजय राऊत हे शनिवार व रविवार फक्त पर्यटनासाठी येतात. शिवसेना हा वटवृक्ष पण संजय राऊत बांडगुळ आहेत, बांडगुळ हे वटवृक्ष संपवतात. तसेच राऊत यांनी माझा डीएनए तपासण्याची गरज असल्याचे म्हटले. मात्र, तुमचा जर डीएनए तपासाला तर तो शिवसेनेचा नसेल, अशा शब्दांत त्यांनी राऊतांना सुनावले.

दरम्यान, नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेले रुपेश पालकर म्हणाले की, खासदार संजय राऊत म्हणतात जे गेले त्यांना ओळखत नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावावर हे शिवसेना (Shivsena) कार्यालय आहे. त्यामुळे मी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर दावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर योगेश बेलदार म्हणाले की, संजय राऊत हे शरद पवारांकडे (Sharad Pawar) जाऊन शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत. तसेच तुडवा तुडवी काय असते हे संजय राऊतांना आम्ही दाखवून देऊ. कुठे यायचं ते सांगा, आम्ही पालापाचोळा आहोत का ते दिसून येईल, असे आव्हान त्यांनी राऊतांना दिले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यांनी नाशकात पत्रकार परिषद घेत म्हटले होते की, येडे गबाळे पकडतात, पदाधिकारी म्हणून प्रवेश करतात', नाशिकमध्ये शिवसेना जशी तशी आहे, दोन-चार ठेकेदार तिकडे गेले असतील, मात्र शिवसेनेचे पदाधिकारी, प्रमुख आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसैनिक जागेवरच आहेत, असे ते म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com