नाशिक । Nashik

गाठीशी पीठ, मीठ, मिरची असा शीधा बांधून आज घाटनदेवी मंदिर परिसरात हजारो शेतकऱ्यांचा जत्था विसावला होता. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या पंजाबच्या शेतक-यांना पाठींबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे काल रवाना झाले आहेत. दरम्यान काल सायंकाळी घाटनदेवी परिसरात मुक्काम करीत आज सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांनी मुंबईकडे कूच केली.

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पायी निघालेला असून केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत. मूठभर कॉर्पोरेटस्ना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा घाट घातला जातोय. यास विरोध करण्यासाठी गेल्या ५८ दिवसांपासून देशातील पाचशे शेतकरी संघटना एकत्र येऊन संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक लढा देत आहे. दिल्लीतील हा लढा मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचा 'नाशिक ते मुंबई वाहन मार्च आज सकाळी मुंबईकडे रवाना झाला. सोमवारी आझाद मैदानावर जमून सरकार विरोधात एल्गार करण त्यानंतर ते राजभवनवर जाऊन निवेदन देतील.

"लढू अन् सरकारला कायदे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडू' या जिद्दीने या मोर्चात राज्याच्या विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. शेतकरी न्यायहक्कांसाठी लढा देत असताना सरकार मनमानी करत आहेत. त्यामुळे आता सरकारला जाग आणण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा सोमवार पर्यंत चालणार आहे.

राज्यभरातून हजारो आंदोलक वाहनांमधून घटनदेवी मंदिर परिसरात जमा झाले होते. मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला होता. इगतपुरी वरून निघालेला वाहन मार्च २४ तारखेला आझाद मैदानावर सायंकाळी पोहचून महामुक्काम मोर्चा होईल. त्यांनंतर २५ तारखेपासून मोर्चा राजभवनावर निघून २६ जानेवारीपर्यंत चालेल.

तीन कृषी विरोधी व चार कामगार विरोधी कायदे,प्रस्तावित वीज बिल मागे घेण्यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. यामध्ये ५० हजाराहून अधिक आंदोलक सहभागी होतील व लढा व्यापक करतील. जर सरकारने याची दखल घेतली नाही. तर संपूर्ण राज्यभरात जिल्हानिहाय आंदोलन छेडण्यात येईल,अशी माहिती डॉ.ढवळे यांनी दिली.

यावेळी डॉ. ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी. एल. कराड, राज्य सचिव डॉ अजित नवले, सुनील मालुसरे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या मरीयम ढवळे, 'डीवायएफ'च्या नेत्या प्रीती शेखर आदी उपस्थित होते.

भोजनासाठी सोबत शिधा...

सलग तीन दिवस आंदोलक मुंबईत जमणार आहेत. शेतकरी, कामगार आंदोलकांनी सोबत शिधा आणला आहे. मात्र गैरसोय होऊ नये यासाठी सामाजिक संस्था, सिटू प्रणित कामगार संघटना मदत जमा करून भोजन व्यवस्था करणार आहेत अशी माहिती डॉ.डी. एल. कराड यांनी दिली.