सिन्नर बाजार समिती सभापतिपदी शेळके

उपसभापतिपदी खैरनार बिनविरोध
सिन्नर बाजार समिती सभापतिपदी शेळके

सिन्नर | Sinnar

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण शेळके यांची तर उपसभापतिपदी चास येथील संजय वामन खैरनार यांची आज (दि.20) बिनविरोध निवड करण्यात आली.

बाजार समितीवर आमदार माणिकराव कोकाटे गटाची निर्वीवाद सत्ता आहे. मावळते सभापती विनायक तांबे व उपसभापती सुधाकर शिंदे यांनी सहकारी संचालकांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या या जागांवर नव्या संचालकांची निवड करण्यासाठी सहाय्यक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची आज बैठक बोलविण्यात आली होती. त्यात दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोघांंची बिनविरोध निवड केल्याची घोषणा रुद्राक्ष यांनी केली.

शेळके यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून मावळते सभापती विनायक तांबे यांनी तर अनूमोदक म्हणून विनायक घुमरे यांनी सही केली होती. खैरनार यांच्या अर्जावर सूचक म्हणून मावळते उपासभापती सुधाकर शिंदे यांनी तर अनूमोदक म्हणून सुनील घुमरे यांनी अनुमोदक म्हणून सही केली होती.

या निवडणुकीत 18 संचालकांना मतदानाचा अधिकार होता. त्यापैकी माजी सभापती व संचालक अरुण वाघ आणि संचालक दत्तात्रय सानप बैठकीस अनुपस्थित होते. तर विरोधी संचालक उपस्थित असले तरी त्यांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली. दोघांच्या निवडीची घोषणा होताच कोकाटे समर्थकांनी जल्लोष केला.

माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com