सांडपाणी थेट नदीपात्रात

नागरिकांच्या आरोग्याला धोका, ग्रामस्थ संतप्त
सांडपाणी थेट नदीपात्रात

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

संसरी ( Sansari )गावाच्या दारणा नदीपात्रात ( Darna River ) कॅन्टोन्मेंट हद्दीतील नाल्यांचे दुषित पाणी विनाप्रक्रिया सतत सोडल्याने संसरी गावाच्या नागरिकांसाठी पाणी शुध्दीकरण करणार्‍या प्रकल्पास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून येथील जनतेच्या आरोग्यासाठी हे घातक असल्याचे उपसरपंच शेखर गोडसे यांनी सांगितले.

देवळाली कॅम्प शहरापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर संसरी गाव आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील संसरी नाका, जमाल नाला, नागझिरा नाला यांचे घाण पाणी थेट दारणा नदीपात्रात सोडले जाते. तसेच ज्या परिसरातून या सांडपाण्याचे उघड्या नाल्यातून वहन होते त्या परिसरात दुर्गंधी व साथीच्या आजारांचा सामना सतत येथील नागरीकांना करावा लागतो. याबाबत ग्रामपंचायतीने वेळोवेळी कॅन्टोन्मेंट प्रशासनाला माहीती दिलेली आहे.

यावर लवकरच योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. परंतु आजतागायत कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. सध्या पावसाचे प्रमाणही वाढते असून ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर साथीचे रोग फैलावत आहेत. आधीच मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात दारणा नदीपात्रात कॅन्टोन्मेंट हद्दीतील नाल्यांचे दुषित पाणी विनाप्रक्रिया नेहमीच सोडत असल्याने संसरीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तरी कॅन्टोन्मेंट प्रशासकीय अधिकार्‍यांनी या गंभीर समस्येवर लवकरात लवकर योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी शेखर गोडसे यांच्यासह, संतोष कोकणे, अनिल गोडसे, राजेश गोडसे, बाळू गिते, प्रशांत कोकणे, शैलेजा गोडसे, अंजना गोडसे, लखन पठारे, विकास घागरे, धनश्री म्हैसधूने व ग्रामस्थांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ नदी अभियान योजना सुरू केलेली असताना मागील पंचवार्षिकमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डात भाजपची सत्ता होती. मात्र पंतप्रधानांच्या या योजनेला येथे तिलांजली देण्यात आली आहे. देवळालीतील भुयारी गटार योजनेसाठी खा. हेमंत गोडसे यांनी 168 कोटीचा निधी मंजूर करून प्रत्यक्षात सुमारे 70 कोटीचे काम झाले. स्वतंत्र मलनिस्सारण केंद्राची उभारणी करण्यात आली. मात्र आजही देवळालीचे घाण पाणी संसरी येथे दारणा नदीत टाकले जाते ही शोकांतिका आहे. काम करणार्‍या ठेकेदाराने अद्यापही अनेक ठिकाणी कामे अपूर्ण ठेवलेली आहेत. यासाठी बोर्ड प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

शेखर गोडसे, उपसरपंच

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com