ग्रामीण भागात संसर्गाची तीव्रता चिंताजनक

दुर्लक्ष, काळजी घेत नसल्याने ही स्थिती
ग्रामीण भागात संसर्गाची तीव्रता चिंताजनक

नाशिक । Nashik

करोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरी भागासह ग्रामीण भागालाही मोठा विळखा घातला आहे. कोविड-१९ लक्षणांकडे होणारे दुर्लक्ष आणि काळजी घेतली जात नसल्याने संसर्गाची तीव्रता वाढतच चालली आहे.त्यातच बहुतांश लोक हा आजार अंगावरच काढत असल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

त्यातच शहरांमधील कोविड रुग्णांची चर्चा होताना दिसत असून ग्रामीण भागाकडे त्यातुलनेत दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालल्याचे चित्र आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचे संक्रमणाचा वेग मोठा आहे. त्यातच ग्रामीण भागात खबरदारीच्या अभावामुळे संसर्ग वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच करोनाची अनाठायी भीती बाळगल्यामुळे काही सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची परिस्थिती गंभीर होऊन मृत्यू होत आहेत. आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे.

त्यामुळे संवेदनशीलपणे आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शन सूचनांचा अवलंब केल्यास हे संकट टाळता येणार आहे. गोंधळून न जाता करोनाची लक्षणे समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

ग्रामीण भागात प्रतिबंधकात्मक उपाय अल्प

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लोकसंख्येची घनता कमी आहे.परंतु, करोनाचा प्रादुर्भाव शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढतो आहे. ग्रामीण भागात रुग्णांची तपासणी करून त्याला संसर्ग झाला आहे किंवा कसे, हे शोधण्यासाठी किट, मनुष्यबळ हे अत्यंत कमी आहे.

शिवाय लोकांमध्ये करोनाची भीती, अज्ञान आहे. हा आजार लोक अंगावर काढत आहेत. तपासणीसाठी जात नाहीत. योग्यवेळी तपासणी होऊन रुग्णाचे विलगीकरण होत नाही. त्याचा परिणाम म्हणून संसर्गित व्यक्ती अनेक लोकांच्या संपर्कात येते आणि प्रत्यक्ष लक्षणे दिसून येण्याअगोदर अनेक लोकांना संसर्गित करते.

रुग्ण शोधण्यामध्ये आणि तो विलगीकरण कक्षात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यामध्ये विलंब होतो. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागात करोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी वेळीच उपचार घेण्याबरोबरच काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com