पंचाळे । Panchale (वार्ताहर)

हमीभावाने सुरू करण्यात आलेली मका खरेदी राज्य शासनाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या व खरेदी न झालेल्या शेतकर्यांपुढे कमी दराने मका विक्री करण्याची वेळ आली आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने जिल्ह्यातील 9 खरेदी केंद्रांवर 9 हजार 242 शेतकर्यांनी नोंदणी केली तर जिल्ह्यातील स्थानिक तालुका पातळीवरील खरेदी-विक्री संघाच्या वतीने 823 शेतकर्यांची मका खरेदी करण्यात आली. या शेतकर्यांना मक्याचा मोबदला त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

त्यामुळे यावर्षी मका मोबदला वेळेवर मिळाल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, हे समाधान औटघटकेचे ठरले. शासनाने मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत बंद केली. अद्यापही नोंदणी केलेले जिल्ह्यातील 7419 शेतकरी मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.

नाशिक जिल्ह्यासाठी 3 लाख 49 हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. हे उद्दिष्ट अवघ्या 20 दिवसांत पूर्ण झाले. सोळा डिसेंबरपासून मका खरेदीचे शासकीय पोर्टल बंद करण्यात आल्याने तालुका संघांनी मका खरेदी थांबवली. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांना सध्या शिवार विक्री अथवा बाजार समितीमध्ये मका विक्री केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

सध्या व्यापारी बाराशे ते तेराशे रुपये क्विंटल दराने मका खरेदी करत आहेत. त्यामुळे शासकीय दरापेक्षा पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल मागे शेतकर्यास नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाने मका खरेदीसाठी आवश्यक असणार्या बारदानाचा पुरवठा न केल्याने शेतकर्यांनी ज्यादा किमतीत बारदान खरेदी करून त्यात भरून मका विक्रीसाठी आणला.

त्यापोटी क्विंटल मागे वीस ते पंचवीस रुपयांचे नुकसान सोसावे लागले. भरडधान्य योजनेच्या खरेदीची मुदत 31 डिसेंबरला संपत असून त्यापूर्वीच शासनाने मका खरेदी बंद करून शेतकर्यांच्या अजून अडचणीत आणले आहे.

सिन्नर तालुक्यात 1164 शेतकर्यांनी मका खरेदी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. यापैकी 388 शेतकर्यांची मका खरेदी करण्यात आली. 193 शेतकर्यांचे पेमेंट त्यांच्या बँक खात्यांवर वर्ग केले आहे. संघाने शेतकर्याकडील मका खरेदी करण्याची अनेक शेतकर्यांनी मागणी केली आहे. मात्र, शासनाचे उद्दिष्ट संपल्याने खरेदीस मर्यादा आली आहे. शासनाने आदेश दिल्यास संघामार्फत पुन्हा खरेदी प्रक्रिया राबवण्यात येईल.
कचरु गंधास, चेअरमन, खरेदी-विक्री संघ