अनुदानित शाळांना सातवा वेतन आयोग

११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार
अनुदानित शाळांना सातवा वेतन आयोग
File Photo

नाशिक | Nashik

पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळा, कर्मशाळा तसेच मतिमंद बालगृहांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील ११ हजार ५८ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाशिक विभागातील पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिव्यांगांच्या शाळा/कर्माशालांतील शिक्षक व शक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करण्याबाबत लक्षवेधी मांडली होती.

त्या अनुषंगाने नामदार मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने नुकताच शासन निर्णय जारी केला आहे.

दरम्यान, सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल जिल्हा दिव्यांग शाळा व कर्मशाळा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी महेंद्र वाघमोडे, बाळासाहेब भुजबळ, रविंद्र कांबळे, प्रदीप निकम, मिलिंद मून, सिताराम नलगे, रमेश वनिस आदींनी आमदार डॉ. तांबे यांचेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, राज्यमंत्री विश्वजीत कदम, सत्यजित तांबे आदींचेे आभार मानले.

पाठपुराव्याला यश

आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग शाळा/कर्मशाळा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वर्षभर कराेना काळात मंत्रालयांमध्ये सतत पाठपुरावा केला.

तर आमदार डॉ. तांबे यांनी स्वतः मंत्रालयात अनेक वेळा मीटिंगा घेऊन आलेल्या त्रुटी दूर करून प्रश्नमार्गी लावले. यापूर्वीही डॉ. तांबे यांच्या प्रयत्नमुळे दिव्यांग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पाचवा व सहावा वेतन आयोग लागू झाला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com