जिल्ह्यात सतरा लाख करोना चाचण्या

दुसर्‍या लाटेत 5 महिन्यांत आढळले 2 लाख 89 हजार पॉझिटिव्ह
करोना
करोना

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहर तसेच जिल्ह्याने मागील दीड वर्षाच्या कालावधीमध्ये दोन करोनाच्या लाटांना सामोरे जाताना 5 हजार 261 जणांना गमावले आहे. या दीड वर्षाच्या कालावधीत करोना चाचण्यांचा वेग वाढवत प्रशासनाने तब्बल 17 लाख 33 हजार 188 जणांच्या करोना चाचण्या केल्या आहेत. दुसर्‍या लाटेतील पाच महिन्यात यातील 12 लाख 93 हजार 102 चाचण्या करण्यात आल्या तर तब्बल 2 लाख 88 हजार 432 पॉझिटिव्ह या कालावधीत आढळून आल्याने दुसर्‍या लाटेची तीव्रता लक्षात येते.

नाशिक जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात करोना पॉझिटिव्हचा आकडा झपाट्याने घटला आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने अद्यापही प्रशासनास चिंता सतावत आहे. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात करोनाच्या आरटीपीसीआर, रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचण्या शासकीय तसेच खासगी रुग्णालये व लॅबमध्ये करण्यात आल्या. अशा आतापर्यंत एकूण 17 लाख 33 हजार 189 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातील 3 लाख 89 हजार जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या तर तब्बल 13 लाख 42 हजार 137 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये दुसर्‍यांदा केलेल्या चाचण्यांचाही समावेश आहे.

देशभरात करोनाचा फैलाव वाढीस लागल्यानंतर जिल्ह्यात 22 मार्च 2020 ला लॉकडाऊन करण्यात आले होते. तर एप्रिलमध्ये पहिला रुग्ण नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत येथे आढळला होता. तेव्हापासून जिल्ह्यात करोनाचा जोर वाढतच गेला आहे. करोनाची पहिली लाट डिसेंबर 2020, जानेवारी 2021 दरम्यान ओसरली होती. यानंतर पुन्हा दैनंदिन जनजीवन पूर्ववत सुरू झाल्यानंतर व योग्य ते करोना नियमांचे पालन न झाल्याने दुसरी लाट धडकली. ही लाट इतकी तीव्र होती की यामध्ये वयोवृद्धांसह अनेक तरूण तसेच लहान मुलांनाही बाधित केले.

करोनाच्या पहिल्या लाटेत मार्च ते डिसेंबर 2020 पर्यंत जिल्हाभरात 4 लाख 40 हजार जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये 1 लाख 1 हजार जण पॉझिटिव्ह तर 3 लाख 39 हजार जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. दुसर्‍या लाटेत तब्बल 12 लाख 93 हजार 189 करोना चाचण्या करण्यात आल्या. तसेच पॉझिटिव्हचा आकडा 2 लाख 89 हजार पॉझिटिव्ह केवळ या पाच महिन्यात झाले. तसेच पहिल्या लाटेत डिसेंबरपर्यंत 1982 मृत्यू झाले होते. तर दुसर्‍या लाटेत 3 हजार 48 मृत्यू झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com