मालेगावकरांचा ‘सेवा परमोधर्म’

मालेगावकरांचा ‘सेवा परमोधर्म’

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

पुण्य प्राप्तीसाठी गरजवंतांची सेवा हाच परमोधर्म असल्याचा पुण्यश्री शिव महापुराण कथेतील(Shiv Mahapuran Katha Mahotsav ) उपदेशाचे तंतोतंत पालन समस्त मालेगावकरांनी शिव महापुराण कथा श्रवणासाठी आलेल्या लाखो भाविकांची गत सात दिवस तन-मन व धनाने शक्य ती सेवा करत केले. मालेगावकरांच्या( Malegaon residents) या सेवाभावाचे कौतुक करत भाविकांनी आपल्या घरी प्रस्थान केले.

आर्थिक योगदानासह अन्नदान, पाणी, चहा, दूध, बिस्किट, थंडीपासून बचावासाठी ब्लॅकेट, चादर, कापडी बॅग आदींचे वाटप अक्षरश: मुक्तहस्ते केले. आजारी पडलेल्या भाविकांवर डॉक्टरांनी उपचार व औषधोपचार केले तर मुक्कामी असलेल्या भाविकांची नाभिक समाज बांधवांनी दाढी, कटींग केली तर चर्मकार बांधवांनी तुटलेल्या पादत्राणांची दुरूस्ती केली. इतकेच नव्हे भाविक थांबलेल्या मैदानातील कचर्‍याचे निर्मुलन करण्याचे काम देखील मालेगावकर स्वयंस्फुर्तीने करतांना दिसून आले.

दोन हजारावर असलेल्या स्वयंसेवकांनी कथा श्रवणाऐवजी रस्त्यावर उभे राहत वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीकोनातून पोलिसांना मदत करण्यात धन्यता मानली. 5 लाखावर उपस्थिती असतांना देखील बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना कुठलीही अडचण जाणवणार नाही याची दक्षता मालेगावकर घेतांना दिसून आल्याने हा भक्तीचा कुंभमेळा निर्विघ्न पार पडू शकला. मालेगावकर महिला, पुरूष, अबालवृध्दांनी दिलेल्या या निष्काम सेवेचे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्यासह बाहेरगावातील उपस्थित भाविक कौतुक करतच कथा स्थळावरून निरोप घेतांना भावविभोर झाले होते. अनेक भाविकांच्या डोळ्यात मिळालेल्या सेवेबद्दल अश्रू तरारळले होते. आम्ही कथा श्रवणासाठी आलो परंतू मालेगावकरांनी आमची व्यवस्था पाहुण्यांसारखी केली. कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही, अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा, चोपडा, पाचोरा आदी भागातील भाविकांनी व्यक्त केली.

पुण्यश्री शिव महापुराण कथेचे आयोजन येथील कॉलेज मैदानावर करण्यात आले होते. मुख्य यजमान पालकमंत्री दादा भुसे हे असले तरी हा कथा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी शहरातील सर्वधर्मीय भाविकांनी उचलली होती. मुक्कामी थांबणार्‍या भाविकांसाठी मालू कॉम्प्लेक्स मंगल कार्यालयात दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दररोज 60 ते 70 हजार भाविक येथे प्रसाद घेत होते. शेवटचे तीन दिवस तर दिड ते दोन लाख भाविकांनी भोजनाचा लाभ घेतला.

याठिकाणी स्वयंपाक करणार्‍या महाराजांना मदत करण्यासाठी शहरातील महिला भाविक पुढे सरसावल्या होत्या. कुणी पुर्‍या, चपाती लाटल्या तर कुणी भाज्या चिरत स्वयंपाकासाठी आपले श्रमदान दिले. ज्यांच्या घरात स्वयंपाक करण्यासाठी बाई आहे अशा घरातील महिला देखील याठिकाणी आचार्‍यांना स्वयंपाक करण्यासाठी कंबरेला पदर खोचून सेवा देत असल्याचे दृष्टीस पडले. कुणीही भाविक उपाशी झोपणार नाही याची दक्षता समितीबरोबरच मालेगावकरांनी घेतली होती. स्वयंपाक घरात कमी पडत असलेल्या पिठ, तांदुळ, तेल, भाज्या आदी वस्तू मालेगावकरांतर्फे स्वयंस्फुर्तीने आणून टाकल्या जात होत्या. त्यामुळे या अन्नप्रसादालयातून कुणीही उपाशी बाहेर पडले नाही.

भाविकांची वाढती गर्दी व जाणवत असलेला थंडीचा कडाका लक्षात घेत मालेगावकरांनी पहाटे 6 वाजेपासून मुक्कामी भाविकांना चहा, दूध, बिस्किट, पोहे, उपमा, पुलाव आदीचा नाष्टा देण्यास प्रारंभ केला. रात्री देखील मंडपात भाविक भजन, कीर्तनात दंग राहत असल्याने त्यांना चहा, दूध, पाणी देण्याचे काम महिला, पुरूष मालेगावकर रात्री उशीरापर्यंत करत होते. अनेक महिला भाविकांसमवेत लहान मुले देखील असल्याने त्यांना वेफर्स, चॉकलेट, फरसाण, शेव-मुरमुरा आदींचे पाकिट सातत्याने वाटप केले जात होते. विशेष म्हणजे कथास्थळ व परिसरात मोठ्या प्रमाणात झालेला कचरा उचलण्यासाठी देखील मालेगावकर महिला, पुरूष विशेषत: तरूण, तरूणी भाविक पुढे सरसावले होते. स्वयंस्फुर्तीने मैदानातील कचरा उचलून तो कचरा कुंडीत टाकण्याची तरूणाईतर्फे होत असलेली सेवा लक्ष वेधून घेणारी ठरली होती.

कथा श्रवणासाठी लाखो भाविकांची मैदानावर उपस्थिती होती. शुगर, दमा आदी व्याधींमुळे त्रस्त असलेल्या अनेक भाविकांना त्रास जाणवला. मात्र कथा मंडपालगतच अनेक डॉक्टरांनी तंबू उभारून तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गाळ्यांमध्ये तात्पुरते दवाखाने उभारून आजारी भाविकांवर उपचार करत त्यांना औषधे दिली. माऊली रूग्णालयाचे डॉ. सुधाकर देवरे यांच्या टिमने सात दिवसात शेकडो आजारी भाविकांवर उपचार करत त्यांना औषधे दिली. मेडिकल असोसिएशनतर्फे देखील आजारी भाविकांना मोफत औषधे दिली जात होती.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com