बिटकोत बालकांसाठी दीडशे बेडच्या कक्षाची उभारणी

मनपा आयुक्तांकडून बिटको कोविड सेंटरची पाहणी
बिटकोत बालकांसाठी दीडशे बेडच्या कक्षाची उभारणी

नाशिकरोड । प्रतिनिधी

समस्याग्रस्त बिटको कोविड सेंटरला महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज भेट दिली. येथील समस्यांबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच दुसर्‍या ऑक्सिजन प्रकल्पाच्या जागेची आणि बालकांसाठीच्या दीडशे बेडच्या कक्षाची पाहणी केली. दोन कोटींचे सिटी स्कॅन मशीन व अन्य यंत्रणा काम करतात की नाही याचीही माहिती घेतली.

दरम्यान, बिटकोत रुग्णांना महापालिकेतर्फे जेवण, चहा-नाश्ता दिला जातो. प्रतिबंध करूनही रुग्णांचे नातेवाईकांनी रुग्णांना जेवण, चहा-नाश्ता देण्यासाठी गर्दी करत असल्याचे निर्दशनास आल्यावर आयुक्त जाधव यांनी नातेवाईकांना तसेच सुरक्षा रक्षकांना फैलावर घेतले. नातेवाईकांचे प्रबोधन करुन त्यांना बाहेर काढले.

सुरक्षा रक्षकांना-नातेवाईकांना प्रतिबंधाच्या सूचना केल्या. बिटकोतील गैरसोयी दूर करुन सुविधा द्याव्यात अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली. समाधान करोना नियंत्रणात येत असल्याबद्दल माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया आयुक्तांचे कौतुक केले. जागतिक परिचारिका दिन असल्यामुळे मेट्रन आशा मुठाळ व पारिचारिकेचा आयुक्त जाधव यांनी सत्कार केला. परिचारिकांनीही त्यांचे फुल देऊन स्वागत केले.

आयुक्तांच्या दौर्‍यावेळी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय बापूसाहेब नागरगोजे, बिटकोचे नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर, शहर अभियंता संजय घुगे, बांधकाम उपअभियंता नीलेश साळी, विभागीय अधिकारी संजय गोसावी, कार्यकारी अभियंता धर्माधिकारी, स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, शाखा अभियंता डोंगरे आदी उपस्थित होते. ऑक्सिजन निर्मितीसाठी दोन महिन्यापूर्वी बिटकोत स्वतंत्र प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याच्या मागेच नवीन प्रकल्पाची तयारी सुरू आहे.

तसेच बिटकोच्या इमारती मागे लिक्विड ऑक्सिजन टँन्क उभारला जात आहे. या सर्वांची आयुक्तांनी पाहणी केली. तिसर्‍या लाटेत मुलांना धोका जास्त आहे. त्याच्या तयारीचा भाग म्हणून बिटकोत दीडशे बेडचा कक्ष तयार केला जात आहे. त्याचाही आयुक्तांनी आढावा घेतला. एचआरसिटी स्कॅन मशीन बंद होते. ते चालू झाले का याची माहिती त्यांनी घेतली. पाणीपुरवठा, पार्किंग व्यवस्था आदींची पाहणी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com