सत्र परीक्षा पुन्हा लांबणार; करोनाचा प्रादुर्भाव; परीक्षेसाठी कंपनीची नेमणूकही रखडली

सत्र परीक्षा पुन्हा लांबणार; करोनाचा प्रादुर्भाव; परीक्षेसाठी कंपनीची नेमणूकही रखडली

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने सत्र परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपनीची नेमणूक रखडल्याचे समजत असून कंपनीची नेमणूक, करोनाचा प्रादुर्भाव यामुळे परीक्षा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी कंपनीची नेमणूक केली होती. त्यावेळी एक वर्षासाठी करार करण्यात आला होता. आता विद्यापीठाकडून सत्र परीक्षांचे नियोजन करताना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा विचार सुरू होता. मात्र शैक्षणिक वर्षाला झालेला उशीर, शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने झाल्याने परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेऊन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

मात्र ही परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीने व बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांसह दीर्घोत्तरी प्रश्नांचाही समावेश प्रश्नपत्रिकेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम वर्षाची परीक्षा 30 मार्चपासून आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा 20 मार्चपासून घेण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज खुले करण्यात आले. आधीच्या कंपनीचा करार एक वर्षासाठी असतानाही सत्र परीक्षेसाठी पुन्हा नवीन कंपनी नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे.

शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत होण्यासाठी विद्यापीठाने प्रथम आणि द्वितीय सत्राची परीक्षा एकत्रच घेण्याची मागणी अधिसभा सदस्य डॉ. पंकज मिणियार यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. विद्यापीठाच्या नियोजनानुसार जवळपास दीड महिना ही परीक्षा चालणार आहे. त्यामुळे द्वितीय सत्र आणखी लांबणीवर पडून सुरू होण्यासाठी मे महिना उजाडणार आहे.

पण विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 31 मे रोजी शैक्षणिक वर्ष संपणार आहे. उन्हाळी सुटीनंतर द्वितीय सत्राचे कामकाज पूर्ण करून दिवाळीपर्यंत द्वितीय सत्राचे काम संपेल. त्यामुळे विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेसाठी दीड महिना देण्यापेक्षा त्वरित द्वितीय सत्राचे वर्ग घेऊन एकत्रित दोन्ही सत्रांची परीक्षा घ्यावी. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होऊ शकेल, असे डॉ. मिणियार यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com