समृद्धीच्या दोन्ही बाजुने शेतकर्‍यांसाठी सर्व्हिस रोड

आ. कोकाटे यांच्या पाठपुराव्याला यश; १२ जिल्ह्यातील ३९२ गावांना फायदा
समृद्धीच्या दोन्ही बाजुने शेतकर्‍यांसाठी सर्व्हिस रोड

सिन्नर । Sinnar

बहुचर्चीत नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कडेला दोन्ही बाजुने शेतकर्‍यांसाठी सर्व्हिस रोड सोडून महामार्गाची संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी आ. माणिकराव कोकाटे यांनी सरकारकडे वारंवार केली होती.

त्यांच्या या मागणीचा फायदा राज्यातील १२ जिल्ह्यांतील सुमारे १३२ गावांतील शेतकर्‍यांना झाला असून समृद्धीच्या दोन्ही बाजुने शेतकर्‍यांसाठी सर्व्हिस रोड ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहीती आ. कोकाटे यांच्याकडून देण्यात आली.

समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी प्रस्तावित असलेल्या संरक्षक भिंतीमुळे शेतकर्‍यांची शेतातील वहिवाट बंद होणार होती. शेतकर्‍यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी शेतकर्‍यांना दळणवळणासाठी सर्व्हिस रोड बांधावा व त्यासाठी दहा फुटांची जागा सोडून संरक्षक भिंत आतमध्ये घेण्यात यावी यासाठी आ. कोकाटे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

सुमारे ७२० किमीच्या या द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजू मिळून सुमारे ०१ हजार ४४० किमीचा सर्व्हिस रोड होणार आहे.

युती शासनाच्या काळात समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करण्यात येऊन त्याचे कामही सुरू झाले. शासनाने संपादित केलेली सर्व जमीन या महामार्गासाठी वापरण्याचे निश्चित झाले. ठिकठिकाणी जमिन संपादित झाली. जमिनीचे सपाटीकरण झाले तोपर्यंत शेतकर्‍यांना स्वतःच्या किंवा दुसर्‍यांच्या शेतामध्ये ये-जा करण्यासाठी भविष्यात काही अडचणी येतील, असे वाटले नव्हते. मात्र भराव टाकून रस्ता उंच बनल्यानंतर महामार्गासाठी जमीन जिथपर्यंत संपादित आहे.

तिथपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सात फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू झाले. यामुळे शेतकर्‍यांची वहिवाट बंद पडणार होती. सिन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांनी आ. कोकाटे यांना याबाबत माहीती दिल्याने कोकाटे यांनी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण मोपलवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत ही बाब मांडली.

शेतकर्‍यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी शेतकर्‍यांसाठी सर्व्हिस रोड बनविण्यासाठी दहा फूट जागा सोडून संरक्षक भिंत बांधावी, अशी कोकाटे यांची मागणी तात्काळ मान्य करत समृद्धी महामार्गाच्या संबंधित अधिकार्‍यांना त्यानुसार काम करण्याचे आदेश देण्यात आले असून याचा फायदा राज्यातील 12 जिल्ह्यांतील सुमारे 132 गावांतील शेतकर्‍यांना होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com