उत्तम सेवा देणार्‍या सेवकांचा होणार गौरव
नाशिक

उत्तम सेवा देणार्‍या सेवकांचा होणार गौरव

महसूल दिनाचे औचित्य साधून सोमवारी गुणगौरव

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गतवर्षी लोकसभा व विधानसभा निवडणूक यशस्वीरित्या जिल्हा प्रशासनाने पार पाडली. पूरजन्य परिस्थिती, अवकाळी अशा संकटातही जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून परिस्थिती हाताळल्याने जीवितहानी व नुकसान टाळता आले. त्यात साहजिकच महसूल विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली. उत्तम प्रशासकीय कार्य करणारे अधिकारी आणि सेवक यांचा महसूल दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि.३) गुणगौरव केला जाणार आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे लोकसेवा हमी कायदा अंतर्गत १०१ सेवा देणारा हमी कायदा अंमलात आणून त्याचा लाभ नागरिकांना देण्यात आला. अतिवृष्टीमुळे पिकांचे तत्काळ सर्वेक्षण करून पंचनामे केले गेले आणि सहा लाख शेतकर्‍यांना ५७८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई थेट बँक खात्याद्वारे अदा करण्यात आली. मतदार नोंदणी राबवून तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यात आले.

लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्हा प्रशासनाद्वारे केलेल्या विशेष प्रयत्नामुळे लोकसभा निवडणुकीत विक्रमी ५९ टक्के मतदान झाले. पंधरा तालुक्यांमधील जुने अभिलेखातील महत्त्वाचे कागदपत्रांचे संगणकीकृत स्कॅनिंग करून त्याचे जतन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील सर्व शेतकर्‍यांच्या जमिनीचे एकूण १२ लाख ४६ हजार ८८५ सात बाराचे संगणकीकरण करण्यात येऊन ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरीने नागरिकांना सातबारा वितरित केला जात आहे.

गेल्या वर्षभरामध्ये शेतकरी कर्ज मुक्ती योजना, शेतकरी पीकविमा योजना, वनहक्क अधिनियमाची अंमलबजावणी अशी विविध कामे जिल्ह्यातील महसूल प्रशासनालाद्वारे पार पाडण्यात आलेल्या आहेत. विविध आव्हाने असूनही महसूल प्रशासनाने त्यांची जबाबदारी चोख बजावली.

मागील वर्षात निवडणुका, पूर परिस्थिती, अवकाळी पाऊस या सर्वांना यशस्वी तोंड देत महसूल विभागाने सर्वच विभागात उत्तम कामगिरी केली आहे. उत्कृष्ट प्रशासकीय कार्य करणारे अधिकारी आणि सेवक यांचा महसूल दिनाच्या निमित्ताने गौरव केला जाणार आहे.

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Deshdoot
www.deshdoot.com