
निफाड | प्रतिनिधी | Niphad
गावातील मुलभूत प्रश्नांकडे शासन लक्ष देत नाही. वारंवार निवेदने देऊनही शासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे जोपर्यंत मुलभूत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कारसूळ येथील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे यांनी दिला आहे...
निवेदनात म्हटले आहे की, आज देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली आहे. परंतु, आजही निफाड तालुक्यातील कारसूळ गाव विकासाने व भौतिक सुविधांनी स्वतंत्र झाल्याचे भासत नाही. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात कारसूळ गाव आहे. परंतु, आम्ही फक्त कॅलिफोर्नियात नावालाच राहतो. आमच्या गावच्या विकासाबाबत किंवा अन्य कोणत्याही प्रश्नावर नागरिकांची बोळवण केली जात आहे.
शासन व प्रशासन दरबारी वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य व आदीसाठी वारंवार पाठपुरावा केला जातो. पण, यासाठी खेडेगावात लवकर सुविधा मिळत नाही. परंतु, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात सर्व आलबेल असतानाही कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. त्या तुलनेत खेड्यात मात्र ५ ते १० लाख रुपयांवर बोळवण केली जाते.
मग शहरात आणि खेड्यात हा दुजाभाव का? शहरातील जनता टॅक्स भरते, मतदान करते आणि खेड्यातील जनता याला आपवाद आहे का? शासनाकडून जाहिरातीवर कोटी रुपये खर्च केला जातो. एखाद्या गावाने कोट्यवधी रुपयांचा निधी मागितला तर ती विकासकामे निकषांत बसत नाही. यामुळे आम्हाला प्रश्न आहे की शहरात माणसं राहतात आणि खेड्यात कोण?
गांधीजीनी खेड्याकडे चला हा मुलमंत्र दिला होता. पण, विकासाअभावी जनता शहराकडे चालली आहे. आम्ही कारसूळकर म्हणणार नाही आम्हाला दुसऱ्या राज्यात किंवा देशात जायचे. परंतु, आमच्या गरजा व भावनांकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. आम्ही वारंवार मंत्रालय, लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. पण, अद्यापही कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही.
जोपर्यंत मागण्या मान्य करण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत १४ ऑगस्टपासून ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला टाळे लावून बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याचे काजळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, निवेदनाच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे आदींना पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, पिंपळगाव बसवंत पोलिसांनी काजळे यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवली आहे.