कोटंबी घाटातील वळणावर अपघातांची मालिका

कोटंबी घाटातील वळणावर अपघातांची मालिका

पेठ तालुका वार्तापत्र | सुनील धोंडगे Peth

नाशिक - पेठ महामार्गावरील ( Nashik-Peth Highway )कोटंबी घाटाच्या वळणावर ( Kotambi Ghat )वारंवार अपघात ( Accident )होवून हे वळण जीवघेणा बनला आहे. कित्येकांना जीव गमवावा लागला तर कित्येकांना अपंगत्व पत्करावा लागला तरीही संबंधित विभागाकडून आवश्यक ती खबरदारी अजुनही घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिक-पेठ वरील कोटंबी घाटाच्या वळणावर गेली. कित्येक महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रत्येक दिवशी लहानमोठे अपघात होणे ही बाब नित्याची झाली आहे. वाहनांच्या प्रचंड नुकसानीबरोबरच असंख्य जिवांना प्राण गमवावे लागत असून अनेकांना कायमचे अपंगत्व येऊन हलाखीचे जीवन जगत आहे.

यावर काही उपाय होणे अपेक्षित आहे. रस्ता दुरुस्ती अथवा नवीन रस्ता तयार करतांना तो नियमानुसार प्रवासासाठी अनुकूल होणे आवश्यक आहे. परंतु ही ठरावीक वळणावरील अपघात मालिका राष्ट्रीय महामार्ग निर्मीती नंतरच सुरु झाली हे देखील तितकेच महत्त्वाचे. मग याला जबाबदार कोण? सदोष रस्ता बांधणी की वाहन चालकांचा बेदरकारपणा? हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे. अपघात झाल्यानंतर पोलीस प्रशासन जागेवर जावून पंचनामा करते.

झालेला अपघातात कोणत्या वाहनाची चुकी होती याचा शोध घेत वाहनचालकांवर गुन्हा दाखल करतात. परंतु गुन्हा दाखल करण्याइतपतच कार्य प्रशासनाचे आहे का? एखाद्या ठिकाणी वारंवार अपघात होत असेल तर त्यात वाहनचालकांनाच दोषी ठरवण्यापेक्षा संबंधित विभागाने त्यावर उपाययोजना करणे अपेक्षित आहे. परंतु तसे न होता वाहनचालकांवर बेदरकारपणाचा ठपका ठेवत वेळ मारली जाते.

परंतु जसे वाहनचालकांच्या चुकीमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होवू शकतो मग संबंधित विभागाने जर रस्ता तयार करतांना काही दोष ठेवले असतील तर त्या संबंधित अधिकार्‍यांवर देखील गुन्हे दाखल होणे ही काळाची गरज बनली आहे. जर संबंधित विभागाने चुकी केलेली असतांना तसेच आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याने होत असलेल्या अपघाताला फक्त वाहनचालकच जबाबदार ठरत असेल तर वाहनचालकांना कोणी वाली आहे का? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. या घाट वळणावरुण मोठ्या आकाराचे व क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक होत असते हे वास्तव आहे .

तसेच अनेक ट्रकचालक रस्ता उतारामुळे वाहन न्युट्रेल गिअरमध्ये चालवत असतात. डिझेल वाचविणे हा उद्देश असला तरीही इंजिन बंद असल्याने वळणावर ब्रेक लागत नसल्याने ही अपघात होत असतात हे वास्तव कुणी समजून सांगत नसल्याने अपघातानंतर वाहतूक कोंडीचा फटका सर्वांनाच बसत असतो. या मार्गावरील अपघातग्रस्त जागेपासून 2 कि. मी. वर आरटीओचे चेक पोस्ट आहे. मात्र त्यांनीही कधी अपघात घडणे मागील कारणमीमांसा जाणून घेऊन कठोर कारवाई करीत नसत्याने प्रतिदिन वाहन अपघाताची मालीका सुरु आहे . सदरचे वळण दुरुस्त करणेस मोठा वाव असतांना त्याचा साधा विचारही शासन यंत्रणेकडून होतांना दिसत नाही . ही बाबही मोठी व दुर्देवी असल्याचे दिसून येते.

सावळघाटात स्वतंत्र औटपोस्ट गरजेचे

कोटंबी घाटाप्रमाणेच सावळघाटही असाच धोकेदायक झालेला आहे. या घाटाची सिमा दोन तालुक्यात अनुक्रमे पेठ व दिंडोरी अशी विभागलेली आहे.

सिमावादामुळे काही वेळा अपघात घडले नंतर गुन्हा कुठल्या पोलिस ठाण्यात वर्ग करायचा हा प्रश्न वाहनधारकांना सतावत असतो. पेठ पोलिस ठाणे त्या मानाने अपघाताची वर्दी देण्यासाठी व त्यानंतरचे सोपस्कार पाडण्यासाठी सोयीची आहे. दिंडोरी सिमेत अपघात घडल्यास दिंडोरी पोलिस ठाण्याचे सब पोस्ट नसल्याने दिंडोरीला वर्दी देऊन पंचनामा आदींसाठी अत्यंत अडचणीचे आहे. दिंडोरीचे एक औट पोस्ट उमराळे येथे आहे.

मात्र अपघाताच्या गुन्ह्याची नोंद दिंडोरीला जाऊन करणे अत्यंत गैरसोयीचे असल्याने संपूर्ण सावळघाटासाठी गोळशी येथे स्वतंत्र चौकी बसविल्यास अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना त्वरित मदत पोचणे शक्य आहे.

कारण पेठ पोलीस ठाण्यास वर्दी मिळाल्यानंतर अपघाताचे ठिकाणी पोहोचण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने तोपर्यत वाहनकोंडीची समस्या निर्माण होत असल्याने रस्त्याच्या सुधारण्यामुळे नाशिक पेठ मार्गावरून प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढलेली असल्याने आंतरराज्य कराची रकमेही मोठ्या प्रमाणावर शासन दरबारी जमा होत असताना वाहनधारकांंच्या समस्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारीही पुन्हा शासनावर असतांना त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने त्याकडे मानवतेच्या भावनेने पाहाणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याची भावना वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.