वसंत व्याख्य‍ानमाला : संभाजी महाराजांचा विकृत इतिहास बखरकारांनी रचला

ज्येष्ठ विधिज्ञ ऍड.अभिजित बगदे यांची खंत
वसंत व्याख्य‍ानमाला : संभाजी महाराजांचा विकृत इतिहास बखरकारांनी रचला

नाशिक । प्रतिनिधी

परकीयांनी ज्यास योद्धा युवराज म्हणून गौरव केला. त्या छत्रपती संभाजी महाराजांचा विकृत इतिहास बखरकारांनी उभा केला, अशी खंत ज्येष्ठ विधिज्ञ ऍड.अभिजित बगदे यांनी व्यक्त केली. डिजिटल व्याख्यानमालेचे चवदावे पुष्प त्यांनी गुंफले, स्व. माजी महापौर पंडितराव खैरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'छत्रपती संभाजी महाराज'या विषयावर ते बोलत होते...

स्वाभिमान, अभिमान, पितृशक्ती,स्वराज्याशी इमान, लढवय्या,कवी मनाचा राजा,बुद्धिवंत असे अनेक पैलू असलेल्या शिवपुत्राचे वर्णन बगदे यांनी व्याख्यानादरम्यान विशद केले,वास्तविक साडे तीनशे वर्षानंतरही नाटके,चित्रपटातून संभाजी राजांबद्दल खोटा इतिहास मांडला गेला.कलाकृती लोकप्रिय करण्यासाठी खोटी पात्र उभी करण्यात आली,पण शिवरायांचा पुत्र असा असू शकतो का ?

ही भावना कुणाही मराठी मनाला भिडली नाही,असेही ऍड.बगदे म्हणाले. खाफिखानाने मराठ्यांचा इतिहास लिहिला. संभाजीराजांचे वर्णन करताना, स्वतःच्या शौर्याच्या बळावर बलाढ्य झालेल्या या राजावर आक्रमण करावयास शत्रू धजावत नाही, असे म्हटलेय, अशा गुणी राजाची उपेक्षा बखरकारांनी सहेतुक केल्याचे मत बगदे यांनी व्यक्त केले.

संभाजीराजांचे दिलेरखानाच्या गोटात जाणे,हा शिवरायांचा गनिमी काव्याचा भाग होता, फितुरांचा चौरंग करणारा राजा आपल्या पुत्राला कसा माफ करेल?

कारण दिलेरच्या आक्रमणाला परतावून लावणे,हे शिवरायांचे उद्दिष्ट होते,असेही ऍड.बगदे नमूद करतात.

संभाजी राजांच्या मनात अखेरपर्यंत शिवपुत्र असल्याची भावना जागृत होती,म्हणूनच ते औरंगजेबापुढे झुकले नाही, मराठी राजमन मृत्यूला कसे सामोरे जाते,याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संभाजी राजे असल्याचे ऍड.अभिजित बगदे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले,तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com