नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची खरी लढत भाजपाशीच असल्याने आत्तापासूनच कामात लागा. पराभवाने खचून न जाता आत्मपरीक्षण करून पुन्हा निवडणुकांना जाऊन यशाला गवसणी घालु असे प्रतिपादन शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या शिवसेनेच्या उमेदवारांची बैठक नुकतीच झाली. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी महापौर अॅड. यतीन वाघ, माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, योगेश बेलदार, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी बडगुजर बोलत होते.

’जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है’ हे ब्रीदवाक्य सर्वांनी लक्षात ठेवावे. आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीत जिल्ह्यातील एका आमदाराला खूप अल्प मते मिळाली होती. मात्र नंतर त्याने सलग पाच निवडणुका जिंकल्या याची आठवण बडगुजर यांनी करून दिली. 2022 च्या निवडणुकीत शिवसेनेला एक हाती सत्ता मिळवून द्यायची असेल तर पराभूत उमेदवारांनी नव्या जोमाने मतदारांना सामोरे जाऊन नगरसेवक पदासाठी आपण कसे पात्र आहोत हे पटवून द्यावे. दोन उमेदवारांचा प्रभाग व्हावा अशी मागणी आपण शासनाकडे करणार आहोत, असे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले.

बैठकीत पराभूत उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रभागात अन्य उमेदवार देतांना सर्वांना विश्वासात घ्यावे, उमेदवारी देतांना निष्ठावंत उमेदवाराचा विचार व्हावा, उमेदवारांच्या पाठीशी पक्षनेत्यांनी खंबीरपणे उभे राहावे, सहा महिने आधी उमेदवार जाहीर करा म्हणजे सक्षमपणे निवडणुकीस सामोरे जाणे सोपे जाईल, सभांचे योग्य नियोजन व्हावे, शिवसेनेसाठी अनुकूल वातावरण असून त्याचा लाभ उचलण्याची गरज आहे, गेल्या निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या टाळल्या पाहिजेत असे सांगतांना कमी मतांनी पराभूत झालेले उमेदवार अक्षरशः भावूक झाले होते.

यावेळी कैलास चुंबळे(बापू), शोभा फडोळ, तानाजी फडोळ, मनीषा हेकरे, प्रवीण हेकरे, उत्तम दोंदे, कविता म्हस्के, सचिन बनकर, शरद काळे, संदीप डहाळे, संजीवनी वराडे, साहेबराव जाधव, लोकेश गवळी, आशिष साबळे, नरेश सोनवणे आदी उपस्थित होते.