नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे दोन शहरांच्या सांस्कृतिक संबंधांसोबतच शैक्षणिक व औद्योगिक संबंध दृढ होण्यास मदत होणार आहे.नाशिकहून पुणेदरम्यान सध्या महामार्ग एवढाच आधार आहे. या मार्गाने प्रवासाला किमान 5 ते 6 तास लागतात. त्यामुळे दोन शहरांमधील व्यावसायिक संबंध घनिष्ट होऊ शकलेले नव्हते. त्यासोबतच विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा लौकिक आहे. शिक्षणासाठी पुण्याला जाणार्या मुलांची संख्या मोठी आहे.

मात्र नाशिक-पुणे चौपदरी रेल्वेनंतर दोन शहरांमधील अंतर कापण्यासाठीचा वेळ कमी होणार आहे. मुंबई-पुणे- नाशिक हा सुवर्ण त्रिकोण विकसित करण्यातील मोठाअडसर हा नाशिक, पुण्याची कनेक्टिव्हीटी हा होता.

रस्ते चौपदरीकरणापाठोपाठ रेल्वे जोडणीमुळे दोन शहरे खर्या अर्थाने जवळ येत सुवर्ण त्रिकोण घट्ट करणार आहेत. नाशिक हे वेगाने विकसीत होत असलेले शहर आहे. या ठिकाणी 16 ते 17 अभियांत्रिकी महाविद्यालय असून, 21 इंटरनॅशनल स्कूलचे जाळे आहे.त्यामाध्यमातून एज्युकेशन हब म्हणून पुढे येत आहे. शहर परिसरात कार्यरत असलेले लहान - मोठे 300 आयटी उद्योग स्थिरावलेले आहेत.

इंजिनिअरिंग व इलेक्ट्रीकल उद्योगांची मोठी चेन नाशिकला आहे. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या माध्यमातून अभियांत्रिकी उत्पादनांची गुणवत्ता तपासणी व विकास केले जाते. यासोबतच पूर्णत्वाच्या दिशेने चाललेल्या सिपीआरआय टेस्टिंग लॅबच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर लगतच्या राज्यांतील इलेक्ट्रीकल उत्पादनांची तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहे.

दोन शहरांतील औद्योगिक व व्यवसायीक संबंध दृढ होण्यास मदत होईल. यासोबतच सेकंड होम संकल्पनेतून नाशिकच्या गृहनिर्माण व्यवसायालाही गती मिळेल. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉरवर असलेल्या सिन्नर औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणीसाठी उद्योजक वेगाने पुढे येतील.

मनमाड - इंदोर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली आहे. त्यासोबतच नाशिक -पुणे रेल्वे मार्गाचे कामही गतीमान करण्यात आलेले आहे. यामुळे उत्तर भारताला दक्षिण भारताशी रेल्वेने जोडणारा महत्वाचा दुवा म्हणून नाशिक पुढे येणार आहे.

या सेमी हायस्पिड रेल्वे सेवेमुळे नाशिक - पुणे अंतर 2 तासात कापता येणार आहे. त्यामुळे पुण्यात भाडेतत्वावर वास्तव्यास असलेले चाकरमानी , विद्यार्थी अथवा आयटीचे अभियंते दररोज नाशिकहून प्रवास करुन कामावर जाऊ शकतील. यामुळे नाशिकच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.