रब्बी हंगाम खर्चासाठी मका विक्री

रब्बी हंगाम खर्चासाठी मका विक्री

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

अतीवृष्टीमुळे (heavy rain) शेतमालाच्या झालेल्या नुकसानीमुळे आलेल्या आर्थिक अडचणीने त्रस्त असलेल्या मका (maize) उत्पादकांनी रब्बी हंगाम (Rabbi season) व उन्हाळ कांदा (Summer onion) लागवडीसाठी लागणारा खर्च काढण्यासाठी आपला मका विक्रीस काढला आहे. यामुळे बाजार समितीत (market committee) दररोज साडेचारशे ते पाचशे वाहनांव्दारे आठ ते दहा हजार क्विंटल मक्याची आवक गेल्या आठवड्याभरापासून होत आहे.

ओलसर मक्यास 1200 ते 1300 रूपये तर कोरड्या मक्यास 1500 ते 1700 रूपये क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे. रब्बीचा खर्च भागविण्यासाठी काहीसा ओलसर असलेला मका नाईलाजास्तव विक्रीस काढावा लागत आहे. मात्र उत्पादन खर्च निघेल असा अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, आठवडाभरापासून हजारो क्विंटल मक्याची खरेदी व्यापार्‍यांतर्फे करण्यात आली आहे. आद्रता असलेला मका वाळवावा लागत आहे. तसेच विक्रमी खरेदीमुळे ठेवण्यास जागा देखील अपुर्ण पडत आहे. अशातच हवामान विभागातर्फे (meteorological department) मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने उद्या बुधवार व गुरूवार रोजी शेतमालाचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनेतर्फे घेण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष भिका कोतकर यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.

उन्हाळ कांदा लागवड (Onion planting) व रब्बीची कामे डोक्यावर आहेत. हंगामाची तयारी व सज्जता केली नाही तर पेरणी कशी करणार? मका कोरडा केला पाहिजे हे बरोबर असले तरी ते करण्यासाठी आता तरी वेळ नाही. महत्वाचे म्हणजे रब्बी हंगाम घेण्यासाठी लागणारा खर्च आणायचा कुठून हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात मका विक्रीस काढावी लागण्याची वेळ आली असल्याची व्यथा अनेक उत्पादक शेतकर्‍यांनी बोलून दाखवली.

बाजार समितीसमोरील कॉलेज मैदानावर रात्री पासूनच मका विक्रीसाठी ट्रॅक्टर, टेम्पो, पिकअप आदी वाहनांव्दारे शेतकरी (farmers) आणत आहेत. दररोज चारशे ते पाचशे वाहनातून सुमारे 8 ते 10 हजार क्विंटल मका विक्रीसाठी आणला जात आहे. मालेगाव तालुक्यासह (malegaon taluka) बागलाण (baglan), नांदगाव (nandgaon), चाळीसगाव (chalisgaon) आदी तालुक्यातील शेतकरी देखील येथील बाजार समितीत मका विक्रीसाठी आणत आहेत. मक्याचा लिलाव होताच अवघ्या काही तासात त्याचे पेमेंट रोखीने व्यापार्‍यांतर्फे होत असल्यामुळे येथील बाजार समितीत मका विक्रीसाठी आणला जात असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

मक्याची लवकर विक्री व्हावी व वाहनाचे भाडे दोन दिवसासाठी लागू नये या दृष्टीकोनातून सायंकाळीच मक्याने भरलेली वाहने घेवून शेतकरी कॉलेज मैदानावर दाखल होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे रात्री कुडकुडतच मक्याची राखण करत मैदानावर बसावे लागते. दुपारपर्यंत लिलाव झाला तर ठिक नाही तर सायंकाळी लिलाव झाल्यावर रात्री उशीरा पैसे पदरात पडल्यावर घरी जावे लागते.

कधीकधी संपुर्ण दिवस लिलावाच्या प्रतिक्षेत मैदानावर काढावा लागतो. मात्र मक्याचा लिलाव झाल्यावर लगेच पदरी पडत असलेल्या पैशांमुळे लोकांची देणी तसेच रब्बी हंगाम व कांदा लागवडीसाठी लागणार्‍या खर्चाची तरतूद करणे शक्य होत असल्यामुळे हा त्रास सहन करावा लागतो.

अतीवृष्टीमुळे शेतमालासह भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. शासनाने अतीवृष्टीचे अनुदान जाहिर केले असले तरी ते अद्याप हातात पडलेले नाही. मात्र रब्बीची व कांदा लागवडीची कामे डोक्यावर आहेत. याचा खर्च करायचा कुठून या विवंचनेतूनच मका विक्रीस काढावा लागत आहे. मात्र मका ओला असल्याचे सांगून अपेक्षित भाव पदरी टाकला जात नसल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

रब्बी हंगामाची कामे तसेच कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे. अतीवृष्टीमुळे शेतमालाची हानी झाल्याने आर्थिक विवंचना आहे. शेतीच्या कामांसाठी पैसे लागणार आहे. उसनवारी फेडल्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मका विक्रीसाठी शेतकर्‍यांनी काढला आहे. पैशांच्या विवंचनेमुळेच मका कोरडा न करता काहीसा ओलसर विक्रीस काढावा लागत आहे.

आबाजी अहिरे, शेतकरी, आघार बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मक्याची आवक होत असली तरी कोरड्या मक्यास 1500 ते 1700 रूपये असा चांगला भाव मिळत आहे. ओलसर मक्यास 1200 ते 1400 रूपये भाव दिला जात आहे. शेतकर्‍यांनी चांगला भाव मिळण्यासाठी मका कोरडा करून आणला पाहिजे.

भिका कोतकर, अध्यक्ष व्यापारी संघटना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com