बचतगट
बचतगट
नाशिक

बचतगटांचे अर्थकारण संकटात...

फायनान्स कंपन्यांचा तगादा

Kundan Rajput

नाशिक । Nashik

करोना संकटामुळे छोटे मोठे उद्योग देशोधडिस लागले असताना बचत गट देखील त्यास अपवाद नाही. उन्हाळ्यात वाळवणाच्या पदार्थांतून मोठि उलाढाल करणार्‍या बचतगटांना लाखोच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. अनेक बचतगटांना कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न पडला असून खासगी फायनान्स कंपन्या वसुलीसाठि तगादा लावत आहे.

महिलांना त्यांच्या पायावर उभे राहून स्वालंबी बनावे हा बचतगट स्थापनेचा उद्देंश. महिला आर्थिक महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचतगट निर्मितीपासून त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत महापालिका, जिल्हापरिषद याचे मिळून चार ते पाच हजार बचत गट आहेत. करोना संकटापुर्वी शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार, उन्हाळयात लोणची, पापड, शेवाया, कुरडई, मिरची व मसाले हे तयार करत. तसेच कागदी व कापडी पिशव्या व इतर वस्तू तयार करुन बचतगटांचे अर्थकारण सुरु असायचे. त्यातून लाखोंची उलाढाल होवून महिलांना उत्पन्न मिळायचे. पण करोनामुळे बचतगटांचा उन्हाळी हंगाम वाया गेला.

अगदी ३० ते ४० टक्के व्यवसाय झाला. करोनामुळे इतर वस्तुंचे उत्पादन ठप्प झाले. ऊत्पादन केले तरी लाॅकडाऊनमध्ये त्याची विक्री शक्य नव्हती. त्यामुळे बचतगटांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. असंघटित क्षेत्रातील अनेक बचतगटांनी उद्योग सुरु करण्यासाठी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेले आहेत. पण करोनामुळे उत्पादन व विक्री ठप्प असल्याने हप्ते फेडायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

आॅनलाईन विक्रीचा निर्णय

अनेक बचतगटांनी करोनाचे संकट लक्षात घेता मास्क, सॅनिटायझरचे उत्पादन सुरु केले आहे. तसेच इतर उत्पादने आॅनलाईनद्वारे विक्रिचे प्रयत्न सुरु केले आहेत.

बचतगटांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. खासगी फायनान्स कंपन्या कर्जफेडीसाठी तगादा लावत अाहेत. मराठवाड्यात या जाचाला कंटाळून बचतगटाच्या महिला आत्महत्या करत आहे. शासनाने त्यांचे कर्ज माफ करावे.

- काॅ.राजू देसले, राज्यसचिव, आयटक

करोना संकटामुळे बचतगटांचा उन्हाळी हंगाम वाया गेला. बचतगट आता मास्क, सॅनिटायझर निर्मिती करत आहे. बचतगटांची इतर उत्पादने आॅनलाईन विक्रिचा आमचा प्रयत्न आहे.

- डाॅ.अश्विनी बोरस्ते, संस्थापक अध्यक्ष, नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सहकारी पतसंस्था

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com