नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांकडे हत्यारे बाळगण्याच्या संशयावरून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत आठ गुन्हेगारांना हत्यारसह अटक केली.

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या आदेशानुसार व उपयुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

यामध्ये गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना घरी जाऊन त्यांच्या घराची झडती घेत १ गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे, ६ कोयते, २ तलवार, १ चोपर, लोखंडी रॉड व हातोडा अशी हत्यारे जप्त करून गणेश घुसळे, नागेश सोनवणे, अक्षय जाधव, जितेंद्र चौधरी, शुभम पेंढारे, हितेश देवरे, अल्ताफ सय्यद यांना अटक करण्यात आली तर हरीश निकम याच्या घराची झडती घेतली असता हत्यारे मिळून आली.

मात्र तो घरी आढळून आला नाही. ही मोहीम सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी, श्रीपाद परोपकारी, अनिल पाटील, गुन्हे शाखा युनिट क्रमांक २चे वपोनी अजय शिंदे, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, श्रीकांत निंबाळकर, महेंद्र चव्हाण, राकेश हांडे यांच्यासह २० अधिकारी १२७ अंमलदार, २३ महिला पोलीस, 5 होमगार्ड आदींनी ही मोहीम यशस्वीरित्या राबवली.