खरीपासाठी मिळणार अनुदानावर बियाणे

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
खरीपासाठी मिळणार अनुदानावर बियाणे

देवळाली कॅम्प | Deolali Camp

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाच्या वतीने आगामी खरीप हंगामासाठी शासकीय अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठी १५ मे पर्यन्त ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

राज्य सरकारचे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठी अनुदान तत्त्वावर बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यात सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, तीळ, बी. टी. कापूस, ज्वारी, मका व बाजरी चे बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे. तरी सदर घटकांचा लाभ घेण्याकरिता या योजनेचे अर्ज महाडीबीटी पोर्टल वरून शेतकऱ्यांनी (दि. १५) मे पर्यंत कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचे कडे करावयाचे आहेत.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी वर्गाकडे आधार कार्ड , तसेच ७/१२ व खाते उतारा राष्ट्रीयकृत बैंकेचे चालू खाते पुस्तक व मोबाईल ओटीपी साठी सोबत असने गरजेचे आहे. तसेच शेतकरी स्वत हजर राहणे गरजेचे आहे.

या शिवाय लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येणार असून लॉटरीचा मॅसेज शेतकरी वर्गाचे मोबाईल नंबरवर पाठवीला जाणार आहे.

तरी शेतकऱ्यांनी या महत्त्वाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन नाशिक तालुका कृषि अधिकारी आर. टी. वाघ यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com