दुसऱ्या राज्यस्तरीय जुदो चॅम्पियनशिपला सुरुवात

दुसऱ्या राज्यस्तरीय जुदो चॅम्पियनशिपला सुरुवात

नाशिक | Nashik

जिल्हा जुदो असोसिएशनच्या (District Judo Association) वतीने आणि महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जुदो चॅम्पियनशिप (Maharashtra Judo Association) लीग स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे...

नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात (Meenatai Thackeray Sports Complex) आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन नाशिकच्या मित्र विहार क्लबचे (Mitra Vihar Club) अध्यक्ष विनोद कपूर (Vinod Kapoor) सचिव सांगळे, नाशिक जिल्हा जुदो असोसिएशनचे सचिव तथा जेष्ठ संघटक डॉ. रत्नाकर पटवर्धन, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील (Deepak Patil) राज्य जुदो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेटकर, क्रीडा संघटक आनंद खरे, राष्ट्रीय खेळाडू तथा उद्योजक सुरेश कापडीया, साईचे प्रशिक्षक विजय पाटील, या स्पर्धेचे डायरेक्टर अमोल देसाई यांच्या उपस्थतीत संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दुर्गा जाधव आणि योगेश शिंदे यांनी केले.

यावेळी विनोद कपूर म्हणाले की, जुदो सारख्या वैयक्तिक खेळाच्या स्पर्धा संघ तयार करून सांघिक स्पर्धा आयोजित केल्यामुळे खेळाडूंमध्ये संघभावना तयार होण्यास मोलाची मदत झाली आहे. मित्र विहार क्लबकडून जुदो खेळाला कायमच सहकार्य दिले असून यापुढेही असेच सहकार्य मिळेल असे त्यांनी सांगितले.

या स्पर्धाला आमदार राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, मी जुदोचा राष्ट्रीय, विद्यापीठ खेळाडू आहे. या खेळामुळे मला माझ्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात खूप फायदा झाला आहे. त्यामुळे खेळाडूंनी मेहनत करून आपल्या जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव देशात आणि परदेशात उंचवावे असे त्यांनी सांगितले.

तसेच या स्पर्धेमध्ये रायगड चॅलेंजर्स, शिवनेरी किंग्स, तोरण टाईगर्स, हरीहर हंटर्स, अंनकाई अटॅकर्स, तुंग टायटन्स, पन्हाळा पिलर्स, लोहगड लिजंट्स, चंदेरी क्रॅकर्स आणि कोंढणा वॉरियर्स या दहा संघांचा समावेश असून प्रत्येक संघामध्ये पाच पुरुष आणि पाच महिला अशा दहा खेळाडूंचा समावेश आहे.

या स्पर्धेमध्ये ५५ किलो, ६० किलो, ६६ किलो, ७३ ते ८१ किलो वजनी गट आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा शिंदे, आदित्य धोपवकर, गौतमी कांचन, केतकी गोरे आणि राष्ट्रीय खेळांडु वैष्णवी खलाने, करुणा थत्तेकर, ईशान सोनवणे, मनीष खवळे, भक्ति भोसले, मिथीला भोसले, शुभांगी राऊत, शायना देशपांडे, निशांत गुरव, हर्षवर्धन निकम आदी खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी या दहा संघांचे संचालक (मालक) यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या दहा संघाची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून प्रथम गटवार साखळी सामने खेळविले जात आहेत. त्यानंतर गटवार साखळीमधील कामगिरीच्या आधारे दोन्ही गटातून पहिले दोन संघ पुढील टप्यासाठी पात्र ठरणार आहेत. तसेच आज खेळल्या गेलेल्या साखळी सामन्यात 'अ' गटामध्ये शिवनेरी किंग्स संघाने हरीहर हंटर्स संघावर ६० विरुद्ध ४० अशी २० गुणांनी मात करून विजयी सलामी दिली. तर अंनकाई अटॅकर्स संघाने तुंग टायटन्सला ७० विरुद्ध ३० अश्या ४० गुणांनी पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात रायगड चॅलेंजर्स संघाने हरीहर हंटर्सला ६० विरुद्ध ४० अश्या २० गुणांनी पराभूत केले.

तर 'ब' गटात झालेल्या पहिल्या सामन्यात चंदेरी क्रॅकर्स संघाने कोंढणा वॉरियर्स संघावर २० गुणांनी मात करून आपला पहिला विजय साजरा केला. तर तोरणा टायगर्स विरुद्ध लोहंगड लिजंट्स यांच्यात झालेल्या चुरशीच्या दुसऱ्या सामन्यात तोरणा टायगर्सने शेवटची लढत ६० विरुद्ध ५० अशा दहा गुणांनी जिंकून विजय मिळविला. तर तिसऱ्या सामन्यात पन्हाळा पिलर्स संघाच्या खेळांडुनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत चंदेरी क्रेकर्स संघाचा ८०-२० अश्या ६० गुणांनी पराभव करून विजयाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू केली.

दरम्यान, या स्पर्धेमध्ये विजयी ठरणाऱ्या संघाला १ लाख रुपये आणि आकर्षक चषक तर उपविजयी संघाला ५१ हजार रुपये आणि चषक तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघाला ३१ हजार रुपये आणि चषक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेला आमदार राहुल ढिकले, मित्र विहार क्लब (Mitra Vihar Club) आणि यशवंत व्यायाम शाळा (Yashwant Vyayam Shala) यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com